विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीची बोलणी सुरू असतानाच बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत भाजपच्या रमेश कराड यांना पक्षात प्रवेश दिला. त्यांचा उस्मानाबाद येथे उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला आहे.

कराड यांचे राष्ट्रवादीमध्ये जाणे महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना झटका मानला जातो. कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जात. भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी अजूनही या जागेवरील दावा काँग्रेसने सोडलेला नाही. गुरुवारी काँग्रेसचा उमेदवारही अर्ज दाखल करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसकडून पापा मोदी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. आघाडीची बोलणी होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने आक्रमक होत भाजपमधून कराड यांना राष्ट्रवादीत आणले आणि त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला. या पाश्र्वभूमीवर विधान परिषदेच्या निवडणुकीत  आघाडी होणार की फिसकटणार, या प्रश्नाचा गुंता वाढला आहे.

भाजपनेही उमदेवार म्हणून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्या सुरेश धस यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. या अनुषंगाने भाजपच्या कोअर कमेटीमध्येही शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. गुरुवारी ते शक्तिप्रदर्शनासह उस्मानाबादेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघाचे नेतृत्व आतापर्यंत काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख करत होते. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या विधान परिषदेच्या जागेवर दावा दाखल केला. केवळ दावा न करता भाजपमध्ये अस्वस्थ असणाऱ्या कराड यांच्याशी बोलणी केली. त्यांना बुधवारी पक्षात प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेल्या या उमेदवारीकडून राजकीय न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया कराड यांनी व्यक्त केले.