News Flash

‘चकवा’!

‘चकवा’! भारतीय जनता पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही उपाधीच. विशेष म्हणजे तेदेखील ही उपाधी सकारात्मक अंगाने घेतात.

| January 7, 2015 01:55 am

भाजपमध्ये वर्षांनुवर्षे काम करताना एखादा कार्यकर्ता लढविलेल्या २३ पैकी २२ निवडणुका जिंकतो कसा? जालना व औरंगाबाद जिल्ह्य़ात उत्तरादाखल एक शब्द हमखास वापरला जातो, तो आहे ‘चकवा’! भारतीय जनता पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही उपाधीच. विशेष म्हणजे तेदेखील ही उपाधी सकारात्मक अंगाने घेतात. एका बाजूला संघाच्या करडय़ा शिस्तीत जुळवून घेणारा आणि याच वेळी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा, अशी रावसाहेबांची ओळख..

जालना जिल्ह्य़ातील भोकरदन तसे छोटे गाव. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग आलेले. खासदारांच्या घराच्या बाजूला मोठा मंडप टाकलेला. कार्यकर्ते जमलेले. भाषणे झाली आणि राधामोहन सिंग हे रावसाहेब दानवे यांच्या घरात आले.. तसे घर प्रशस्त. समोरच छत्रपती शिवाजीमहाराजांचा मोठा फोटो. भोवताली हिरवळ. तेथे अनेक कार्यकर्ते बसलेले. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग खास संघाच्या पठडीतला माणूस. अगदी धोतराची निरीसुद्धा इस्त्री केलेली. त्या शिस्तीच्या माणसाबरोबर रावसाहेब बोलत होते. भोवतालचे कार्यकर्ते काहीशा अंतरावर. बहुतेक कार्यकर्त्यांचे कपडे मळलेले. जणू रानातून काम करून भाषण ऐकायला आलेले.
रावसाहेब एका बाजूला राधामोहन सिंगांना बोलत होते, तेव्हा दुसऱ्या बाजूला निराधार योजनेतील लाभार्थी वाटावेत, अशा त्यांच्या कार्यकर्त्यांनाही त्याच वेळी काही सूचनाही देत होते. प्रत्येकाला नावानिशी हाक मारून कोणते काम कोणाला सांगायचे, हे त्यांचे ठरले होते. तसा एरवी अघळपघळ बोलणारा गडी एकाच वेळी माणसेही हाताळत होता आणि वरिष्ठ नेतेही. सत्ता आल्यानंतर भोकरदनच्या त्यांच्या घरातील हे दृश्य रावसाहेबांची क्षमता सांगणारे. ‘चकवा’ अशी उपाधी जालन्यातील मंडळींनी त्यांना दिली आहे. कारण हा माणूस कसा निवडून येतो, याची चर्चा नेहमीच मतदारसंघात असते. ठासून भरलेला ग्रामीण बेरकीपणा हे रावसाहेबांचे वैशिष्टय़. पण ते दिल्लीत रमले नव्हते. परत आले, ते मोठय़ा पदावर. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील भाजपचा चेहरा अधिक ‘व्यापक’ होईल, असे त्यांच्या निवडीने मानले जात आहे.
रावसाहेबांची भाषा तशी अघळपघळ. त्यांची अशी एक खास शैली आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘मी बारा भोक्शाचा पाना आहे. कुठेही फिट बसतो.’ कोणाला कसा चकवा दिला, असे किस्से त्यांच्या तोंडून ऐकण्यात एक वेगळीच गंमत असते. एका आंदोलनात पोलिसांनी त्यांना अडवले. रावसाहेब मग वारकरी झाले. कोणाला कळलेच नाही की, हे वारकरी नाहीत. आंदोलकांना जाण्यास बंदी असणाऱ्या ठिकाणी वारकरी वेशात ते गेले आणि आंदोलन यशस्वी करून परत आले. तसा विरोधी पक्षात असतानाही सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात त्यांचे नाव चर्चेत असे. विशेषत: साखर कारखानदारीतला त्यांचा ‘रस’ लपून राहिलेला नाही. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी मोठे काम केले. जिल्हा बँक, खरेदी-विक्री संघ, बाजार समित्या, जिनिंग मशीन, दूध संघाच्या जडणघडणीत ‘आपले’ कार्यकर्ते घुसविणे हे रावसाहेबांनी पद्धतशीरपणे केले आहे. भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथे भाजपचा कार्यकर्ते ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास निवडणुकीत यश मिळवत झाला आहे. त्यामुळे भाजपमधील त्यांच्या विरोधातील मंडळींनाही फारसे काही करता येत नाही. दलित, मुस्लीम समाजातही रावसाहेबांचे अनेक कार्यकर्ते. अडवाणींची रथयात्रा, गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेत ते होते. आत्माराम सुरडकर या मोलमजुरी करणाऱ्या कार्यकर्त्यांला त्यांनी जिल्हाध्यक्ष केले, तर औरंगाबादच्या महापालिकेत सभापती असणाऱ्या नारायण कुचे यांना आमदार करण्याचीही किमया केली. माणसे हाताळताना त्यातील चांगल्या-वाईटांसह पुढे जाणारा नेता, अशी त्यांची मराठवाडय़ात ओळख आहे. मात्र, हा माणूस दिल्लीत रमला नाही, हा संदेश नेहमी मिळत असे. राज्यात अधिक चांगले काम करू, असे संकेतही त्यांनी नुकतेच एका पत्रकार बैठकीनंतर अनौपचारिक गप्पांमध्ये दिले होते. प्रदेशाध्यक्षपद जाहीर होण्यापूर्वीच सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाला गती द्यावी लागेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले होते. त्यांच्या निवडीने भाजपमधील जातीच्या समीकरणाचेही संतुलन झाल्याचे मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2015 1:55 am

Web Title: raosaheb danwe chakawa
टॅग : Aurangabad
Next Stories
1 केबीसी, साईकृपानंतर आता जयभारत मल्ट्रिटेड
2 उस्मानाबाद जिल्हा बँक माणकेश्वर शाखेला टाळे
3 आजपासून ४४ वाळूपट्टय़ांचे ऑनलाईन लिलाव
Just Now!
X