करोनाच्या संसर्गाबाबत रत्नऋगिरी जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला असून गेल्या २४ केवळ १२ नवीन करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर तब्बल ८७ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.२९ टक्केवर गेले आहे.

दरम्यान, दिवसभरात दोघांचा या रोगामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३०२ वर गेली आहे.

गेल्या महिन्यात काही दिवस २४ तासातदोनशेहून जास्त रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. पण महिनाअखेर हे प्रमाण कमी होऊ लागले. गेल्या काही दिवसांपासून तर दररोज आढळून येणाऱ्या नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने दोन आकडी राहिली आहे. शुक्रवारी त्यामध्ये नवा नीचांक गाठला गेला आहे. तसेच रूग्णसंख्येबाबत नेहमीच आघाडीवर राहणाऱ्या चिपळूण (६) आणि रत्नागिरीसह (३) लांजा(२) व दापोली तालुक्यातही (१) नवीन रूग्ण अत्यल्प प्रमाणात सापडले आहेत, तर मंडणगड, खेड, गुहागर, संगमेश्वर आणि राजापूर या पाच तालुक्यांमध्ये एकही करोनाबाधित रुग्ण गेल्या २४ तासांत सापडलेला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्गात करोनाबाधित घटले

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रीय ६०० रुग्ण आहेत. तर आज ५७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत एकूण ३ हजार ८०३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी आणखी ३० व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल बाधीत आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५२० तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११७ झाली आहे.