निखिल मेस्त्री

पालघर जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाच्या कंत्राटी अभियंत्यांच्या पुनर्नियुक्ती प्रक्रियेत अतिरिक्त कार्यभार असलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंतामार्फत अनियमितता झाल्याचा आरोप केला जात आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात गेली अनेक वर्षे कंत्राटी तत्त्वावर कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत. या विभागात मनुष्यबळ अपुरे असल्याने ११ महिन्यांसाठी या अभियंत्यांची नियुक्ती केली जात आहे. दरवर्षी मुदतवाढ देऊन कनिष्ठ अभियंत्यांना कंत्राटी पद्धतीने पुनर्नियुक्ती देण्यात येत आहे. असे असले तरी यंदा पाणीपुरवठा लेखा विभागच्या म्हणण्यानुसार प्रशासकीय निधी अपेक्षेप्रमाणे उपलब्ध न झाल्याने याचा परिणाम पाणीपुरवठा विभागांच्या विविध देयकांच्या प्रदानावर होत असल्याने अभियंत्याचे मानधन निधीअभावी प्रदान करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी या कंत्राटी अभियंत्यांना पुनर्नियुक्ती देण्यासंदर्भात पाणीपुरवठय़ाच्या सहाय्यक लेखाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मार्चमध्ये मार्गदर्शन मागवले होते.

पाणीपुरवठा विभागाकडे कनिष्ठ अभियंत्यांच्या पगार देयकाबाबत निधीची उपलब्धता नाही, असा अभिप्राय कार्यालयीन टिप्पणीत लेखाधिकाऱ्यांनी दिले होते. या टिपणीचा विचार न करता या विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेले कार्यकारी अभियंता रवींद्र दुधे यांनी १२ कनिष्ठ अभियंत्यांची आवश्यकता असल्याचे दाखवून स्वत: टिप्पणी तयार करून फेरनियुक्ती द्यावी, असा सूचित करून स्वाक्षरी केली. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी स्वत: टिप्पणीत नमूद करून त्यावर स्वाक्षरी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे त्या सादर केल्याने ही बाब नियमबाह्य़ असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात या टिप्पणी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पूर्तता करून देणे अपेक्षित होते. तरीही खुद्द कार्यकारी अभियंत्याने स्वाक्षरी करून फेरनियुक्तीसाठी प्रस्ताव पाठविणे हे अनियमितता असल्याचे आरोप होत आहेत. अभियंत्यांच्या पगारासाठी व भत्त्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध नाही, असा अभिप्राय लेखा विभागाने कळविला होता.

पाणीपुरवठा लेखा विभाग निधी नसल्याने अभियंते यांचे पगार आणि भत्ते याबाबत अडचण निर्माण होऊ  शकते, असे सांगत असतील तर त्याचा विचार न करता फेरनियुक्त्या दिल्या कशा?

-सुरेखा थेतले,विरोधी पक्ष नेत्या जि. प. पालघर

शासन निर्णयानुसार फेरनियुक्त्या देणे रास्त नसले तरी मनुष्यबळअभावी नियुक्त्या केल्या आहेत. त्यांना आजवर वेतन दिले गेले आहे आणि पुढेही निधी उपलब्धतेनुसार पगार दिले जातील.

-भारती कामडी, पाणीपुरवठा समिती प्रमुख, जि.प.पालघर

पाणीपुरवठा विभागात असलेल्या योजना व कामांचा पसारा तसेच मनुष्यबळ कमतरता लक्षात घेत या फेरनियुक्ताय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने रीतसर प्रक्रिया करून केल्या आहेत. यात कोणतीही अनियमितता नाही.

-रवींद्र दुधे, कार्यकारी अभियंता