कोल्हापूर आणि सांगलमधील पुराचं पाणी ओसरलं असून मदतीसाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत. पुरात सगळं वाहून गेल्याने नव्याने संसार उभं करण्याचं आव्हान पूरग्रस्तांसमोर आहे. दरम्यान अनेक लोक सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. दरम्यान रिलायन्सने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला असून पाच कोटींची आर्थिक मदत दिली आहे.

रिलायन्सकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता पाच कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच कोटींचा हा धनादेश सोपवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकारही मोठ्या प्रमाणात पुढे सरसावले असून मदत पाठवण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद आणि मराठी मनोरंजन सृष्टीकडून पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर आणि कोकण पट्ट्यातील भागाला शुक्रवारी सकाळी मदत रवाना झाली.

“संकटांशी लढण्याची शिकवण शिवाजी महाराजांकडून मिळालीये”, अक्षय कुमारचा पूरग्रस्तांना संदेश

खिलाडी अक्षय कुमारने सांगली आणि कोल्हापूरकरांसाठी एक खास संदेश पाठवला असून धीर धरा असं आवाहन केलं आहे. यावेळी अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत संकटांशी लढण्याची शिकवण त्यांच्याकडून मिळाली असल्याचं म्हटलं आहे. “कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे खूप नुकसान झालं आहे. तुम्ही सर्वांनी धीर धरा असं मी आवाहन करतो. लढणं आणि पुढे जाण्याची शिकवण आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांकडून घेतली आहे”, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे. तसंच सरकार आणि कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन ग्रूप तुमची प्रत्येक मदत करण्यासाठी तत्पर आहे. मला विश्वास आहे की तुमचं शहर, जिल्हा, गल्ली, आधीपेक्षा सुंदर आणि चांगलं करतील असंही अक्षय कुमारने सांगितलं आहे.