नगर : सुप्रिया, सारंग आणि दिव्या या तिन्ही बालकांनी जन्मल्यानंतर लगेच मृत्यूशी  संघर्ष सुरू केला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या त्यांच्या मातांनी या बालकांची फरफट होऊ नये म्हणून स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राला साकडे घातले. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या स्पर्शाने त्यांचा जणू पुनर्जन्म झाला. सुप्रिया या बालिकेला इटली देशातील कनवाळू पालक आणि दोन मोठे भाऊ मिळाले. सारंगला टाटा उद्योग समूहातील वरिष्ठ व्यवस्थापकांनी, तर दिव्या या बालिकेस पुण्यातील नामवंत वकील दाम्पत्याने दत्तक घेतले.

स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या रु पाली जयकुमार मनोत बालकल्याण संकुलात आज, गुरुवारी हा दत्तक विधान सोहळा झाला तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. मुंबईच्या धारावीतील राजश्रीच्या आई-वडिलांनी कर्ज काढून रिक्षाचालकाशी लग्न लावून दिले. वर्षभरात तिला मुलगा झाला. परंतु पतीच्या अनैतिक संबंधांमुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राजश्रीने स्वाभिमानाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या शिक्षणातील अडचणींमुळे तिने पुन्हा लग्न करण्याचे ठरवले. परंतु राजश्रीला लग्नाच्या आणाभाका देणारा तिला पाचवा महिना लागल्यावर परागंदा झाला. तिने स्नेहांकुरशी संपर्क केल्यावर तीन तासात टीम तिच्यापर्यंत पोहोचली. २२ मार्च २०१८ रोजी नगरमध्ये तिची प्रसूती केली. सुप्रियाचा जन्म झाल्यावर तिला अनेक व्याधी आणि आजार जडल्याचे लक्षात आले. अवघ्या बाराशे ग्रॅम वजनाच्या सुप्रियाची आजारामुळे परिस्थिती चिंताजनक झाली. पुणे येथील केईएम रु ग्णालयात हलवण्यात आले. स्नेहांकुरचे समन्वयक संतोष धर्माधिकारी, वीरेश पवार, परिचारिका शालिनी विखे आणि सविता काळे यांनी सलग बारा दिवस सुप्रियाला केईएम रु ग्णालयात राहून उपचार दिले. या काळात स्नेहांकुरच्या रु ग्णवाहिकेत सर्वानी बारा दिवस रहिवास केला. अखेरीस सुप्रिया धोक्यातून बाहेर आली. सुप्रियाला व्हेनिस (इटली) शहरातील पियारली दाम्पत्त्याने दत्तक घेतले. स्वत:चे एक मूल असलेल्या या दाम्पत्याने यापूर्वी केरळ येथील एका अपंग बालकास दत्तक घेतले आहे. लग्नाचा ५१ वा वाढदिवस स्नेहांकुर प्रकल्पात साजरा करणाऱ्या लता व अशोकलाल भळगट, या सोनईतील (ता. नेवासा) दाम्पत्याच्या हस्ते सुप्रियाला पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

दि. ४ नोव्हेंबर २०१८ रोजी, केज (बीड) येथील बरडफाटा येथे कोणीतरी आणून टाकलेले बाळ दिसून आले. या बाळाला प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्याच्या सर्वागाला लाल मुंग्या लागलेल्या होत्या. वेदनांनी विव्हळणाऱ्या बालकास वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांंनी बीडच्या बालकल्याण समितीचे सदस्य तत्त्वशील कांबळे यांना साकडे घातले. त्यांनी स्नेहांकुरशी संपर्क केला. बीड जिल्हा शासकीय रु ग्णालयानेही उपचारांसाठी मदतीचा हात दिला. कांबळे यांच्या पुढाकाराने हे बाळ स्नेहांकुरमध्ये दाखल झाले. टाटा उद्योग समूहातील सुवर्णा आणि रश्मी यांनी या बालकाचा स्वीकार केला. साधना आणि नरेंद्र काळे या समाजसेवी दाम्पत्याच्या हस्ते सारंगचे दत्तक विधान करण्यात आले.

सावित्रीच्या शेतमजुरी करणाऱ्या वडिलांचे सहा वर्षांंपूर्वीच निधन झाले होते. आई मोलमजुरी करून प्रपंच चालवायची. नातेवाईक असलेल्या एका शिकलेल्या मुलाशी आईने सावित्रीचे लग्न लावून दिले. परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेणे, तिला मारहाण करणे, सतत दारू पिणे याला कंटाळून सावित्रीने नवऱ्याचे घर सोडले आणि आईबरोबर मोलमजुरी सुरू केली. सावित्रीने पुन्हा प्रपंचाचा घाट घातला. होणाऱ्या पतीने तिच्यावर शरीरसंबंधांची जबरदस्ती केली, नंतर वेगवेगळी कारणे देत लग्न टाळले. पुढील सारे प्रश्न निस्तरण्यासाठी कोपरगावमधील स्नेहालय प्रकल्पाच्या संघटक संगीता शेलार यांनी तिला स्नेहांकुरपर्यंत पोहोचवले. दि. ३१ जानेवारी २०१८ रोजी दिव्याचा जन्म झाला, स्नेहांकुरने प्रसूती आणि त्यानंतरची बाळाची, आईची सर्व काळजी यथायोग्य घेतली. संगणक तज्ज्ञ भूषण मुथीयान व ऋतुजा संजय गुगळे यांनी दिव्याला पुणे येथील नामांकित वकील दाम्पत्याकडे सुपूर्द केले.

स्नेहालयचे मानद संचालक निक कॉक्स यांनी प्रास्ताविक, तर अ‍ॅड. श्याम आसावा यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दत्तक विधान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अजय वाबळे, मनीषा खामकर, कविता पवार, साहेबराव अरु ने, प्रवीण पवार, उत्कर्षां जंजाळे, जुई झावरे-  शिंदे यांनी परिश्रम घेतले.