21 January 2021

News Flash

वंचित आघाडीत बिघाडी; लक्ष्मण मानेंनी मागितला प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा

या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

लक्ष्मण माने आणि प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत मोठ्या जोमाने उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीत निवडणुकीनंतर बिघाडी झाली आहे. संघटनेतील पदाधिकारी असलेले लक्ष्मण माने यांनी बंड पुकारले आहे. त्याचबरोबर वंचित आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका वंचित आघाडीला बसू शकतो.

‘प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपाच्या लोकांना सामावून घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला याचा थेट फायदा झाला आहे. आघाडी ही आता बहुजनांची राहिली नसून उच्चवर्णीयांची झाली आहे,’ अशा शब्दांत लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव घेत टीका केली. तर या टिकेला उत्तर देताना पडळकर यांनी माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना या दोघांनी एकमेकांवर दोषारोप केले.

माने म्हणाले, पूर्वी संघाशी आणि भाजपाशी संबंधित असलेल्या गोपीचंद पडळकर यांना वंचित आघाडीत महासचिवपद देण्यात आले आहे. यावर माने यांनी आक्षेप घेतला असून आम्ही आघाडी उभारण्यात मेहनत घेतली मात्र, आता हे आयत्या बिळावर नागोबा झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने समविचारी आणि पुरोगामी पक्षांना पाठींबा देणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्याने आमच्यामुळे त्यांच्या दहा जागा गेल्या. प्रतिगामी पक्षांना मदत करणे ही आमची चूक होती. मी सच्चा आंबेडकरवादी असून संघ, भाजपा, शिवसेनेचे समर्थन करु शकत नाही. त्यामुळेच वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदाचा आपण राजीनामा दिला असून प्रकाश आंबेडकरांसोबत काम करु शकत नाही, तसे पत्रही आपण आंबेडकर यांना पाठवले आहे, असे माने यांनी म्हटले आहे. तसेच संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, या सर्व वादावर प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘वंचित आघाडीत अठरापगड जातीने लोक आहेत. त्यामुळे लक्ष्मण मानेंकडून अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली गेली असेल. वंचित आघाडीत मी एकटा नसून इतरही अनेक नेते आहेत. लक्ष्मण माने हे देखील वंचितचे नेते असून ते पक्षात कायम राहतील,’ असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 4:02 pm

Web Title: revolt in vanchit aaghadi lakshman mane demangded resignation of prakash ambedkar aau 85
Next Stories
1 २६/११ च्या हल्ल्यातून वाचलेल्या डॉक्टरचा अपघाती मृत्यू
2 खड्ड्यांमुळे नितेश राणेंचा ‘स्वाभिमान’ दुखावला, उप अभियंत्यावर चिखलफेक
3 पंढरीची सायकलवारी: १५ वर्षाच्या मुलीने एका दिवसात केला २५० किमीचा प्रवास
Just Now!
X