|| रमेश पाटील

फसवणुकीला आळा घालण्यासाठी भौगोलिक मानांकन मिळवण्याचे प्रयत्न:-  ‘वाडा कोलम’ तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर असताना त्याचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी येथील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवीन झिनी या वाणाच्या भातापासून ‘वाडा कोलम’ची लागवड केली आहे. तर दुसरीकडे वाडा कोलमबाबत ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तालुक्यातून उत्पादित होणाऱ्या वाडा कोलमला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

‘वाडा कोलम’ या तांदळाला एक विशिष्ट चव, वास येत असल्याने तसेच खाण्यासाठी तो रुचकर असल्याने या तांदळाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर वाढती मागणी आहे. ही  मागणी लक्षात घेऊन चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांत पिकविला जाणारा अन्य वाणातील तांदूळही वाडा कोलमच्या नावाने मुंबई बाजारात विकला जाऊ  लागला आहे.

बाहेरून येणाऱ्या बनावट वाडा कोलममुळे ग्राहकांची फसवणूक आणि त्यातच तो कमी दराने विकला जात असल्याने वाडा येथील मूळ वाडा कोलमचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विक्रीदरावर त्याचा मोठा परिणाम होऊ  लागला. त्यामुळे या तांदळाचे उत्पन्न घ्यायला शेतकऱ्यांना परवडत नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन घेणे बंद केले होते.

ग्राहकांना मूळ वाडा कोलम उपलब्ध व्हावा व बोगस वाडा कोलमपासून ग्राहकांची फसवणूक होऊ  नये, यासाठी वाडा तालुका व परिसरातून उत्पन्न होणाऱ्या वाडा कोलमला भौगोलिक मानांकन (जी.आय.) मिळण्यासाठी येथील शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, वाडय़ातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन झिनी या वाणापासून एक चांगल्या दर्जाचा, अत्यंत लहान दाणा असलेला सुवासिक व खायला रुचकर अशा वाडा कोलमची उत्पत्ती केली आहे. गेली अनेक वर्षे वाडा कोलमचे उत्पन्न घेण्याचे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी थांबवले होते. मात्र कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सहकार्याने या वर्षी जवळपास दोनशे एकर जागेत सुधारित ‘वाडा कोलम’ या वाणाची प्राथमिक स्वरूपात लागवड केली आहे.

या वाणाचे भरघोस उत्पन्न आले असून शेतकरी आनंदित दिसत आहेत. पुढील वर्षी अधिक प्रमाणात सुधारित वाडा कोलमचे उत्पन्न घेण्याचे अनेक शेतकऱ्यांनी निश्चित केले आहे.

सुधारित ‘वाडा कोलम’ या तांदळाला शासनाने लवकरच भौगोलिक मानांकन द्यावे. ते दिल्यास निश्चितच अन्य जिल्हा आणि राज्यांतून येणाऱ्या बनावट वाडा कोलमपासून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबेल. – राजेश रिकामे, सुधारित वाडा कोलम उत्पादक, सोनाळे (वाडा)