शहरातील भूमीगत पाईपलाईनमधून ३० एमएलडी घाण व दूषित पाणी रोज सोडण्यात येत असल्यामुळे इरई व झरपट या दोन प्रमुख नद्या प्रदूषित झाल्या आहेत. तब्बल ९० कोटींचा खर्च करून मलनि:स्सारण योजनाची भूमिगत पाईपलाईन व प्लान्ट या दोन्ही नदीतच बांधण्यात आलेले आहे. मात्र, दोन वषार्ंपासून मलनि:स्सारण प्लान्टची भंगार अवस्था झाली आहे.
इरई नदीत रहमतनगर येथे व झरपट नदीत पठाणपूरा गेटबाहेर मलनि:स्सारण प्लान्टची उभारणी केली. मात्र, आज दोन वर्षांंपासून जोडण्यांअभावी मलनि:स्सारणाची पाईपलाईन व प्लान्टची अवस्था भंगार झाली आहे. काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांना प्लान्ट तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले तेव्हा शंभरकर यांनी एक ते दीड महिन्यात प्लान्ट सुरू करू, असे उत्तर दिले होते. मात्र, आजही तो सुरू करण्याच्या दृष्टीने कुठल्याही हालचाली दिसत नाही. कारण, भूमिगत मलनिस्सारण योजनेची पाईपलाईन शहरात केवळ ३० टक्के भागात टाकण्यात आलेली आहे. उर्वरीत ७० टक्के पाईपलाईनचे काम अजूनही शिल्लक आहे. बहुतांश प्रभागांमध्ये सिमेंट व डांबरी रस्ते झाल्यामुळे आता पाईपलाईन टाकणेही कठीण आहे. अशा स्थितीत ही योजना पूर्ण कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने झरपट व इरई नदीतील प्लान्टची पाहणी केली असता तेथील यंत्रसामुग्रीला गंज चढला आहे. आजूबाजूला गवत, शेवाळ लागले आहेत. दोन वर्षांंपासून दोन्ही प्लान्ट नदीत भंगार अवस्थेत पडून असतांनाही जिल्हा व महापालिका याकडे बघण्यास तयार नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल, वायू व ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. जलप्रदूषण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कायदेशीर कावाई करा, असे निर्देशच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. त्याच निर्देशावरून येथील उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण विभागाने शहरातील दूषित व घाण पाणी प्रक्रिया न करता नाल्याच्या माध्यमातून नदीत सोडणाऱ्या महापालिकेला कारवाईची नोटीस बजावली आहे. वेळीच सुधारणा केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही यात म्हटले आहे. मात्र, या नोटीसला मनपाने केराची टोपली दाखविली आहे. प्रत्यक्षात मनपाने कंत्राटदारांच्या मागे लागून हे काम पूर्ण करून घ्यायला हवे होते. मात्र, आज अर्धवट अवस्थेतील कामामुळे प्लान्टची अवस्था भंगार झालेली आहे. परिणामी, शहरातील घाण व दूषित पाणी थेट नदीत जात असल्यामुळे या दोन्ही प्रमुख नद्या प्रदूषित झालेल्या आहेत.