रोहा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज माणगावच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. बँक गरव्यवहारप्रकरणी या सर्वाविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर आता या सर्वाना कधी अटक होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
रोहा अर्बन बँकेचे चेअरमन दिलीप राजे आणि महेंद्र पाटील यांनी संचालक आणि बँकेच्या अधिकारी- कर्मचारी यांना हाताशी धरून २००५-०६ या वर्षांत हा आíथक गरव्यवहार केला होता. कॅश क्रेडिट, मध्यम मुदत कर्ज, घर तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, मशिनरी कर्ज अशी वेगवेगळी ४३८ कर्ज प्रकरणे केली होती. ही प्रकरणे करताना रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले होते. ऐपत नसलेल्यांना ७ कोटी ५६ लाख रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली होती.
याच पद्धतीचा अवलंब करून २००१ ते २००६ या कालावधीत संचालक मंडळाने एकूण ४१ कोटी ११ लाख रुपयांचा अपहार केला होता. या फसवणूक आणि गरव्यवहारप्रकरणी शशिकांत श्रीपती भंडारे यांनी रोहा पोलीस ठाण्यात बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ आणि अधिकारी अशा एकूण २८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या सर्वानी माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.
या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने आपला निकाल शुक्रवापर्यंत राखून ठेवला होता. गुरुवारी या प्रकरणातील पुरावे लक्षात घेऊन सर्व २८ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्र. रा. भरड यांनी जाहीर केले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. सतीश म्हात्रे यांनी काम पाहिले.