शहरी भागातील तरूण असो विद्यार्थिनी अथवा ज्येष्ठ नागरिक असो. बहुतेकांच्या हाती नवमाध्यमांना साद घालणारा ‘स्मार्ट फोन’ असतोच असतो. लवकरच अशी आधुनिक उपकरणे ग्रामीण महिलांच्या हाती दृष्टिपथास पडतील. त्यास निमित्त आहे, महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे राज्यातील २७ जिल्ह्य़ात राबविल्या जाणाऱ्या ‘इंटरनेट साथी’ या अनोख्या उपक्रमाचे.

टाटा सामाजिक संस्थेच्या सहकार्याने या उपक्रमातून प्रशिक्षणार्थी महिलांना टॅब व भ्रमणध्वनी मोफत देऊन ई साक्षर करण्याचे नियोजन आहे. विविध सरकारी योजना, महिलांचे अधिकार, बाजारपेठेतील बदल.. याची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहचविण्यात येतील. या उपक्रमातून साधारणत: चार लाखहून अधिक महिलांना ई साक्षर करण्यात येणार आहे.

नवमाध्यमांचे वारे वाहत असतांना ग्रामीण भाग तुलनेत काहिसा मागास राहिला. त्यातही महिला वर्गात ‘ई-साक्षरतेचे’ प्रमाण तुलनेत कमी आहे. या पाश्र्वभूमीवर, माविमने टाटाच्या सहकार्याने महिलांसाठी ‘ई-साक्षरता’ वर्ग सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. प्रशिक्षणात टॅब तसेच भ्रमणध्वनी कसा हाताळावा, त्यावर तापमान, सरकारी, सामाजिक, आर्थिक, कृषी, उद्योग, महिला यासह अन्य काही महत्वपूर्ण योजनांची माहिती कशी शोधायची, बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग सुरू करायचा असल्यास बाजारपेठेत त्याच धर्तीवर कोणते उद्योग सुरू आहेत, त्यांची उलाढाल, आपल्या व्यवसायात अपेक्षित बदल, महिलांचे आरोग्य विषयक प्रश्न आदीं मुद्यांवर प्रशिक्षणासह माहिती दिली जाते. यासाठी इंटरनेट साथी समन्वयिकेची निवड करण्यात आली आहे. ही निवड करतांना तिला भ्रमणध्वनी तसेच टॅब वापरण्याचे किमान ज्ञान असणे अपेक्षित आहे. या महिलांना या कामासाठी प्रतिमाह १२ हजार रुपये मानधन देण्यात येणार असून पुढील आठ महिने हा उपक्रम राज्यात सुरू राहणार आहे. इंटरनेट साथीच्या माध्यमातून दोन टप्प्यात २८ जिल्ह्णाातील १८३ तालुके. आणि त्या तालुक्यातील ३५,३६८ गावांमध्ये हा उपक्रम एकाच वेळी सुरू असून १००६ महिलांना टॅब, भ्रमणध्वनी ते ठेवण्याचे साहित्य टाटाच्या सहकार्याने मोफत वितरीत करण्यात येणार आहे. याद्वारे राज्यातील चार लाख १६,३१७ महिला ई साक्षर होतील. या साधनांचा वापर कसा करतात याचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा सहाय्यक सनियंत्रण अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

या साक्षरतेमुळे व्यवसायवृध्दी होईलच, पण बदलत्या घडामोडींबाबत महिलांकडे अद्ययावत ज्ञान राहील. त्यांना त्याच्या कामकाजाविषयी अपेक्षित माहिती एका कळसरशी मिळणार असून कुठेही त्यांची अडवणूक होणार नाही. कामाचा वेग यातून वाढेल तसा आत्मविश्वासही, अशी अपेक्षा ‘माविम’चे अधिकारी व्यक्त करतात.