संसदेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकामुळे साठेबाजीवरील नियंत्रण उठवले आहे. तथापि राज्यात व्यापाऱ्यांची कांद्याची गोदामे जप्त केली जात आहेत. ही कृती करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोलून काढावे, असे असा आव्हान माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले. गोदामांवर जप्ती टाकल्याने पुढील हंगामात व्यापारी कांद्याची खरेदी थांबवतील. त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन नगण्य दराने कांदा खरेदी केला जाण्याचा धोका आहे. कांद्याचे दर वाढल्याने जप्तीची कारवाई करून शासन पाप करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.

शेट्टीवर टीका

ऊस परिषदेत उसाचा दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे दिला आहे. यावरून आगामी ऊस गळीत हंगामावरून खोत यांनी शेट्टी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. ‘या हंगामात ठराविक दर दिला पाहिजे म्हणून हट्ट करणे किंवा त्यावरून आंदोलन करणे अयोग्य ठरेल. साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिली पाहिजे. केंद्र शासनानेही साखर विक्रीची आधारभूत किंमत वाढवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मोठ्या रकमेचा दर साखर कारखानदाराकडे मागितला जातो; परंतु तो गेल्या पंधरा वर्षात कधीच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खिशात पोचला नाही, अशी टीकाही त्यांनी शेट्टी यांना उद्देशून केली.

राज्यात सरकार तीन सावत्र भावांचे

अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात शेत पिकाची अपरिमित हानी झाली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी तात्काळ पॅकेज जाहीर केले पाहिजे. मात्र तीन सावत्र भावांचे राज्यात सरकार आहे. प्रत्येकाची भूमिका समजून घेतल्याशिवाय काहीच निर्णय केला जात नाही. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी गुरुवारी प्रत्येक जिल्ह्यात जागरण, गोंधळ आंदोलन केले जाणार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.