साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे. देशातील एकूण ४२ साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवले जाणार आहे. २०१८ या वर्षासाठी जी साहित्य अकादमी पुरस्काराची यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये या दोन मराठी साहित्यिकांची नावे आहेत. रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर  युवा साहित्य अकादमी पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीला जाहीर झाला आहे.

बाल साहित्य पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून मराठी विभागासाठी डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर वसंत पाटणकर आणि बाबा भांड या तिघांनी यांची निवड करण्यात आली होती. तर साहित्य अकादमी युवा पुरस्कारासाठी रा.र. बोराडे, वसंत अबाजी डहाके आणि सतीश आळेकर यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले.

रत्नाकर मतकरी यांनी बाल साहित्यात लिहिलेल्या कथा आणि गोष्टी प्रचंड गाजल्या. बालमनावर एक वेगळाच संस्कार करणाऱ्या या कथा होत्या, अलबत्या गलबत्या हे नाटक आणि त्यातली चेटकिण आणि मधुमंजिरी ही पात्रे अजूनही बालगोपाळांच्या लक्षात आहेत. सध्या हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे.

रत्नाकर मतकरी यांचे बाल साहित्य

अचाटगावची अफाट मावशी
अलबत्या गलबत्या
गाऊ गाणे गमतीचे  (बालगीते)
चटकदार
चमत्कार झालाच पाहिजे
यक्षनंदन
राक्षसराज जिंदाबाद
शाबास लाकड्या
सरदार फाकडोजी वाकडे