“या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे,” असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. एका चौकाच्या नामकरण कार्यक्रमात त्यांनी देशाच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला.

सांगलीतील स्टेशन चौकात झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, “आज आनंदाची गोष्ट होत आहे. फार विलंब झालेली चांगली गोष्ट आज होते आहे. हे नामकरण २५ वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं, ते आज होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांची आशा आकांक्षा होती की, संपूर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी. चौकाचं नामकरण होईल, पण कामाचं काय? या सांगली गावात शिवसेनेच्या २००-२५० शाखा का नाहीत? हे दुःख घेऊन आपण जाऊयात. हे दुःख आपण कार्यान्वित करुया,” असं संभाजी भिडे म्हणाले.

“आज हे नामकरण होतं असलं तरी खरं नामकरण ते आहे, गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा पाहिजे. लोकसेवक तत्पर पाहिजे. हा प्रवाह अखंड चालू राहिल पुढे यासाठी खटपट केली पाहिजे. पद, पैसा, स्थान, मोठेपण हे शुल्लक आहे. आपल्याला संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणून या देशाच्या नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे. हे लक्षात ठेऊन काम करुया. हे काम शिवसेनेच्या कार्यातूनच होऊ शकतं असं माझं स्वतःचं मत आहे,” विश्वास संभाजी भिडे यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजी भिडे म्हणाले, “या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांनी जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. तसंच या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल. भारत म्हणून नाही, तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत आहे. हे लक्षात घेऊन आपण कामावर तुटून पडूया. एका चौकाचं नाव काय पण संपूर्ण देशाचं नाव या नावानं ओळखला गेलं पाहिजे. इतकी महत्त्वाची आहे शिवसेना,” असंही संभाजी भिडे यावेळी म्हणाले.