महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच आपला झेंडा बदलण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मागील काही दिवसांपासून मनसे आपला झेंडा बदलणार असल्याचे वृत्त सोशल मिडियाबरोबर अनेक प्रसारमाध्यमांनी दाखवले आहे. २३ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या मनसेच्या महाअधिवेशानामध्ये राज ठाकरेच यासंदर्भातील घोषणा करणार असल्याचे समजते. मात्र मनसेच्या या झेंड्याला आता संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. मनसेने छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा राजकारणासाठी वापरल्यास आमच्या स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी फेसबुकवर यासंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काय आहे चर्चा?

२३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.

कसा असेल नवा झेंडा?

पक्षाचा सध्याच्या झेंड्यातील चार रंगाऐवजी नवा झेंडा एकाच रंगाचा असेल. भगव्या किंवा केशरी रंगाच्या या झेंड्यावर राजमुद्राही असेल असे समजते. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला केवळ एका जागी यश मिळाल्यामुळे मनसे आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची चर्चा आहे. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक हिंदुत्ववादी पक्षाची उणीव भरुन काढण्याच्या दिशेने राज या विचार करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सर्वसामावेश’ विचारधारेतून तयार करण्यात आलेल्या मनसेच्या सध्याच्या झेंड्याऐवजी भगव्या झेंड्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते. या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचाही वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संभाजी ब्रिगेडचं म्हणणं काय?

संतोष शिंदे यांनी फेसबुकवर संभाजी ब्रिगेडची भूमिक स्पष्ट केली आहे. “मनसे भगवा झेंडा स्वीकारणार असेल तर संभाजी ब्रिगेड त्याचं स्वागत करेल. पण या झेंड्यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरणार असतील तर संभाजी ब्रिगेडचा त्याला विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे प्रतीक ‘राजमुद्रे’चा वापर केला. ‘राजमुद्रा’ ही महाराजांच्या प्रशासनातील एक प्रशासकीय बाब होती. ही राजमुद्रा जर मनसे राजकारणासाठी आणि मते मागण्यासाठी वापरत असेल तर आमचा एक शिवप्रेमी म्हणून आणि संभाजी ब्रिगेडचा मावळा म्हणून कडवा विरोध असेल. झेंड्यावर मनसे राजमुद्रा छापणार असेल तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. संभाजी ब्रिगेड स्टाइल विरोध करु. वेळेप्रसंगी आंदोलनेही करु पण मनसेला आम्ही राजमुद्रा राजकारणासाठी वापरु देणार नाही,” असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रबोधनकार ठाकरेंचा नातू म्हणून…

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपर्यंत १०-१२ वर्षात चार वेगवेगळ्या जातीचे रंग वापरुन मताचं राजकारण केलं. त्यामध्ये ते अपयशी झाले. म्हणून आता शिवाजी महाराजांची भगवी पताका खांद्यावर घेण्याचा त्यांचा मानस आहे. पण प्रबोधनकार ठाकरेंचा नातू म्हणून ते (राज ठाकरे) बुद्धांचा, शिवाजी महाराजांचा किंवा तुकाराम महाराजांचा आणि वारकऱ्यांचा भगवा म्हणून स्वीकारणार असतील तर त्याचं लोकशाही पद्धतीनं आम्ही स्वागत करु,” असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

…म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा?

मनसे आता आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवणार असल्याची चर्चा रंगली आहे. मनेसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेप्रमाणेच मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. यामध्ये दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचे मनसेचे आंदोलन चांगलेच गाजले होते. मात्र त्यानंतर कोणत्याच निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा तितकासा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा मनसेचा विचार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांना या मुद्द्याच्या आधारावर आकर्षित करण्याचा मनसेचा विचार असल्याचे समजते.