सर्व सामान्य नागरीकांपासून ते लोकप्रतिनिधी अन् मंत्री यांना करोनाची लागण होत आहे. राज्यातील दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. आता भारतीय जनता पक्षाचे सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. याची ट्विटरद्वारे त्यांनी माहिती दिली आहे. सोमवारी आलेल्या अहवालात संजयकाका पाटील यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पण कोणताही त्रास जाणवत नसल्यामुळे ते घरीच क्वारंटाईन झाले असून उपचार घेत आहेत.

काही प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यावर करोना चाचणी करून घेतली होती. सोमवारी टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या आशीर्वादांनी माझी प्रकृती चांगली असल्याचे पाटील म्हणाले. संपर्कातील सर्वांनी करोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही पाटील यांनी केलेली आहे.

प्रासारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सांगली जिह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते करोनाबाधित झाले आहेत. जिह्यात सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, विक्रम सावंत, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, सुमन पाटील हे सात आमदार करोनाबाधित झाले आहेत. याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, राजेंद्र अण्णा देशमुख, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेसुद्धा बाधित झाले आहेत. सांगली जिल्ह्य़ातील करोना रुग्णसंख्या आणि करोना बळींची संख्या पोटात गोळा उत्पन्न करणारी आहे. सध्या राज्यात सर्वाधिक करोनाचा प्रादुर्भाव सांगलीत वाढत आहे. एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रात वैद्यकीय उपचारात अग्रेसर असलेल्या मिरज-सांगलीत करोनाचा वाढता फैलाव चिंताजनक आहे.

सांगलीतील करोनाबाधितांची संख्या आता तेरा हजारांच्या घरात पोहोचली आहे. यापैकी सुमारे पाच हजार रुग्ण उपचाराधीन असून त्यामध्येही अत्यवस्थ रुग्णांची संख्या साडेसहाशेवर गेली आहे. रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. अत्यवस्थ रुग्णांना प्राणवायू देण्यासाठी लागणारी यंत्रणा अपुरी आहे. कृत्रिम श्वसन यंत्रांची संख्या मर्यादित आहे. अनेक आजार असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना उपचार करण्यासाठी लागणारी साधने अपुरी आहेत हे गेल्या आठ-दहा दिवसांत सिद्ध झाले आहे. करोना चाचण्या जसजशा वाढविण्यात आल्या तशी रुग्णसंख्याही वाढत गेली.