जयंत पाटील यांना धक्का; एकत्रित येण्याची विरोधकांची रणनीती यशस्वी

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या इस्लामपूर आणि तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गड उद्ध्वस्त करीत विरोधकांनी एकहाती सत्ता मिळविली आहे. राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री जयंत पाटील यांची ही मोठी पिछेहाट मानली जात असून, जिल्हय़ातील या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हय़ातील भाजपची ताकद मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

इस्लामपूर आणि तासगाव हे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे प्रमुख गड मानले जातात. अनुक्रमे जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांच्या गटाच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसची इथे वर्षांनुवर्षे सत्ता राहिलेली आहे. परंतु यंदा या दोन्ही ठिकाणी पक्षासमोर भाजप आणि मित्रपक्षांनी मोठे आव्हान उभे केले होते. इस्लामपुरात तर यासाठी भाजप, शिवसेनेच्या जोडीने स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, मनसे हे सर्वच पक्ष एकत्र आले होते. या आघाडीने आ. पाटील यांच्या तटबंदीला िखडार पाडत नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेतली. खा. राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील आदींनी भेदनीतीचा अवलंब करीत राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या निशिकांत पाटील यांना आघाडीतून नगराध्यक्षपदासाठी उभे करीत विजयापर्यंत पोहोचवले. याशिवाय राष्ट्रवादीच्या बरोबरीने १४ जागा जिंकून सत्तेत निम्मा हिस्सा असल्याचे दाखवले.

इस्लामपूरपाठोपाठ तासगावातील पराभवदेखील राष्ट्रवादीसाठी धक्कादायक आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा हा मतदारसंघ. या मतदारसंघातील नगरपालिकेवर गेली अनेक वर्षे पाटील यांच्या गटाचीच सत्ता होती. परंतु आर. आर. आबा यांच्या निधनानंतर इथली राजकीय गणिते बदलली. या निवडणुकीत पक्षाच्या अन्य नेत्यांनीही पाठ फिरवल्याने आबांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी एकहाती निवडणूक लढवली. जिल्ह्य़ाचे नेतृत्व पटकावण्याच्या प्रयत्नात असलेले आ. पाटील इस्लामपुरात अडकून राहिल्याने तासगावच्या निवडणुकीकडेही त्यांना लक्षही देता आलेले नाही. भाजपचे खा. संजयकाका पाटील यांच्याशी त्यांना सत्तेसाठी झुंजावे लागले. राष्ट्रवादीचा पक्ष म्हणून इथे पराभव झाला असला तरी पाटील यांनी दिलेली एकहाती लढत. भाजप लाटेतही मिळवलेल्या ८ जागा हेही दुर्लक्ष करण्यासारखे नाही.

आ. पाटील यांची या शहरातील ताकद लक्षात घेता त्यांचा हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा आहे. विविध सहकारी संस्थांचे जाळे असलेल्या आ. पाटील यांची मतदारांवरील पकड ढिली होत असल्याचेच हे चिन्ह आहे.