दिगंबर शिंदे

एकीची भाषा वापरत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी तासगावमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वत खासदारांनी वैयक्तिक संपर्क साधून आमंत्रण देण्याची तसदी घेतली. मात्र हे करीत असताना अन्य कोणी आपल्यापेक्षा मोठा होणार नाही याची दक्षताही घेतली.

तासगाव तसे खासदारांचे घरचे मदान.. कार्यक्रम आणि तोही मुख्यमंत्री फडणवीस यांचा यामुळे घरचे कार्य म्हणून तासगावकर हिरिरीने कार्यक्रमात सहभागी झाले. पक्षीय विरोध बाजूला ठेवत राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील या उपस्थित राहिल्या. याखेरीज मिरजेचे आमदार सुरेश खाडे,  सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप या भाजप आमदारांसह शिवसेनेचे अनिल बाबर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख ही मंडळी उपस्थित राहिली.

सर्व समाज बरोबर आहेत हे दाखविण्याच्या उद्देशानेच खासदारांनी हिरवे, पिवळे, निळे आणि भगवे झेंडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणले. हा केवळ भाजपचा कार्यक्रम नसून तो अराजकीय असल्याचे भासविण्याचा प्रयत्न यावेळी दिसून आला. मागील कार्यक्रमात न कळत झालेल्या चुकांचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला असे म्हटले तर वावगे ठरू नये.

खासदार म्हणून संजयकाका पाटील हे जिल्ह्य़ातील सहा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यापैकी तासगाव-कवठेमहांकाळ या एकाच मतदारसंघात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे कार्यकम खासदार घेत असतात, अन्य मतदारसंघात केंद्रीय नेत्यांचे कार्यक्रम का होत नाहीत असा भाबडा प्रश्न भाजपमधीलच काही निष्ठावंत कार्यकत्रे उपस्थित करू लागले आहेत. नितीन गडकरी यांचा नागजला झालेला कार्यक्रम असो वा तासगावचा बेदाणा असोसिएशनचे वार्षकि संमेलन असो खासदारांना हा मतदारसंघच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोषक वाटत असला पाहिजे; अन्यथा सांगली, मिरज, अथवा जत, आटपाडीला असा एकाही वरिष्ठ नेत्यांचा कार्यक्रम होऊ शकला नाही.

जिल्ह्य़ातील विकास कामे करीत असताना सिंचन योजनांना गती देण्यात आपण यशस्वी झाल्याचा दावा करीत असताना टेंभू योजना मेअखेर पूर्णत्वाला जाईल याची खात्री दिली. तर ताकारी, म्हैसाळ योजनेचे पाणी निदान वीज बिलाच्या थकबाकीसाठी निवडणुका होईपर्यंत बंद पडणार नाही याची न बोलता ग्वाही दिली. जिल्ह्य़ातील रस्ते विकासासाठी सुमारे साडेसात हजार कोटींचा निधी केंद्र शासनाच्या मदतीतून उपलब्ध झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करण्यात यश आले. कवठेमहांकाळला ड्रायपोर्ट उभारण्याचा कामाला मिळालेली मान्यताही जमेची बाजू असल्याचे सांगितले. मात्र जत तालुक्यातील ४२ गावांचा पाण्यासाठी चाललेला टाहो मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानी घालूनही त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

एकीकडे पक्षातील मतभेद जाहीरपणे व्यक्त करण्याची भाजपची परंपरा नाही. तरीही सगळे काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री तासगावमधून मुंबईच्या दिशेने झेपावले आणि वास्तू सांगलीत आणि उद्घाटन तासगावात असा प्रकार खुद्द आमदार सुधीर गाडगीळ यांनीच माध्यमासमोर उघड केला. वसंतदादा जिल्हा रुग्णालयात नव्याने बाह्य़ रुग्ण विभागासाठी वास्तू उभा केली आहे. यासाठी जिल्ह्य़ातील आमदारांनी राज्य शासनाकडे आग्रह धरून निधीची उपलब्धता केली आहे. या वास्तूचे उद्घाटन केव्हा आणि कुणाच्या हस्ते घ्यायचे याची साधी विचारणाही मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी आमदारांकडे केली नाही. या वास्तूचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केल्यानंतरच ही माहिती आमदारांना झाली. हा आमदारांचा अवमान असल्याचा आरोप करीत अधिष्ठाता डॉ. सापळे यांना निलंबित करण्याची मागणी करून या संदर्भात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची तयारी आ. गाडगीळ यांनी केली आहे.

रुग्णालय इमारतीचे उद्घाटन हा पूर्णपणे राज्य शासनाच्या अखत्यारीतील विषय आणि प्रयत्नही आमदारांचे असे असताना खासदार पुरस्कृत कार्यक्रमात आमदारांना कोणतीही कल्पना न देता उद्घाटन होतेच कसे? घेतले गेले तर ही बाब खासदारांना ज्ञात नव्हती असे म्हणणे म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्यातील प्रकारच म्हणावा लागेल.