22 February 2020

News Flash

सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७० हे निर्णय ‘फास्टफुड’सारखे; राऊतांचे मोदी सरकारला चिमटे

"मोदी सरकारने भ्रष्टाचार रोखण्यासाठी उद्योगांचे नाक दाबण्याबरोबर तोंडातही बोळा कोंबला आहे."

देशाच्या आर्थिक स्थितीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला जिव्हारी लागणारे चिमटे काढले आहे. देशातील कष्टकरी व मध्यमवर्गीयांचे प्रश्न सोडविल्यामुळे नव्हे, तर पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक आणि कलम ३७० हटवण्याचे धाडस दाखवल्यामुळे मोदी लोकप्रिय नेते आहेत. हे निर्णय ‘फास्टफुड’सारखे आहेत. कारण बेरोजगारी आणि अन्न-वस्त्र-निवारा यावर कलम ३७० आणि सर्जिकल स्ट्राईक हे उत्तर नाही, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक सदरातून देशातील आर्थिक परिस्थितीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचा वादा भाजपाने केला होता. पण गेल्या वर्षभरात १.१० कोटी लोकांनी रोजगार बुडवला आहे. देशात ११ कोटी लोक बेकार असून बेरोजगारीचा दर ६. १० टक्के झाला आहे. १८ राष्ट्रीयीकृत बँकांचे थकीत कर्ज १० लाख कोटींच्या वर गेले आहे. त्यामुळे बँकिंग उद्योग बुडाला. सरकारकडून नव्या गुंतवणूकीचे वायदे केले जात आहेत. पण आतापर्यंत ५०१ रूपयांची तरी गुंतवणुक आली आहे काय? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया कार्यक्रम फौल ठरले आहेत. आजच्या परिस्थितीला नेहरू जबाबदार नाहीत. त्यामुळे त्यांचे पुतळे तोडून स्थिती सुधारणार नाही. गेल्या पाच वर्षात रूपया रोज घसरतो आहे. रूपया घसरला आणि डॉलर वधारला याचे खापरही काँग्रेसवर फोडता येणार नाही. मनमोहन सिंग यांच्या काळात भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे घडली, पण उद्योग जगात मोकळे वातावरण होते. त्यामुळे रोजगार आणि पैसा दोन्हींची व्यवस्था होती. मोदी सरकारने भ्रष्टाचार रोखण्यासाठी उद्योगांचे नाक दाबण्याबरोबर तोंडातही बोळा कोंबला आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान परदेशात असताना देश पेटलेला असेल –
वाढती बेरोजगारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरूनही राऊत यांनी खरमरीत टीका केली आहे. देशोदेशीचे राज्यकर्ते मोदी यांच्या नेतृत्वाचे गुणगान करीत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. पण देशात बेरोजगारी वाढत राहिली तर भडका उडेल व एक दिवस पंतप्रधान परदेशात असताना देश पेटलेला असेल. भारताची अवस्था रशियासारखी होऊ नये. घरच्यांना उपाशी ठेवून परदेशात मोठेपणा मिळवण्याचे अनंत प्रकार रशियन नेत्यांनी केले. शेवटी रशिया कोसळला. तसे भारताचे होऊ नये. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे स्वप्न आपण पाहात आहोत. आपण आता चांद्रयानही सोडले. देश पुढे जात आहे, पण बेकारी आणि भिकारी वाढवून! हे चित्र बदलायलाच हवे, अशी कोपरखळीही राऊत यांनी लगावली आहे.

First Published on August 25, 2019 4:42 pm

Web Title: sanjay raut critcised modi govt surgical strike article 370 decision like fast food bmh 90
Next Stories
1 पूरग्रस्तांसाठी पुण्यातील मूर्तीकारांचा पुढाकार, बाप्पाच्या पाच हजार मूर्ती पाठविणार
2 …तोपर्यंत फेटा बांधणार नाही, खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार
3 जळगावमध्ये मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या