फळबाग लागवड योजनेला रोजगार हमी योजनेत जोडल्यामुळे रायगड जिल्ह्यत रोजगार हमी योजनेला पहिल्यांदाच चांगला प्रतिसाद लाभला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्यला देण्यात आलेले मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दीष्ट गेल्या १० वर्षांत दुसऱ्यांदाच पूर्ण झाले आहे.

कोकणात रोजगार हमी योजनेला फारसा प्रतिसाद लाभत नाही. अशी ओरड नेहमीच केली जात असे. वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण याला कारणीभूत ठरते. मुंबई जवळ असल्याने रायगड जिल्ह्यत मजुरांना कामांच्या चांगल्या संधी उपलब्ध असतात. अकुशल कामकारांनाही दिवसाला चारशे ते पाचशे रुपये मजुरी सहज उपलब्ध होते. या उलट जिल्ह्यत रोजगार हमी योजनेतून मजूरांना दिवसाला २०१ रुपये एवढीच मजूरी मिळते. त्यामुळे रोजगार हमी योजनाबांबत मजुरांमध्ये उदासिनता पाहायला मिळत असे, पण आता हे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यत रोजगार हमी योजनांना अचानकपणे चांगला प्रतिसाद लाभण्यास सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यत रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यला यावर्षी १ लाख ६ हजार १८० मनुष्य दिवस रोजगार निमिॅतीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यातुलनेत यावर्षी २ लाख २२ हजार ८११ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात यश आले. हे प्रमाण एकुण उद्दिष्टाच्या २०९ टक्के एवढे आहे. जिल्ह्यत १३ हजार ४८ मजुरांनी रोजगाराची मागणी केली होती. यातुलनेत १२ हजार ९८८ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. या योजने अंतर्गत ५ कोटी ५ लाख ८८ हजार रुपयांचा निधी खर्च झाला.

महत्त्वाची बाब म्हणजे २०१६-१७ मध्ये रायगड जिल्ह्यला ८४ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यातुलनेत गेल्या १ लाख ३८ हजार ३६३ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झाली होती. हे प्रमाण उद्दिष्टाच्या १६३ टक्के एवढे होते. जवळपास २ कोटी ६१ लाख ५० हजार रुपयांचा निधी खर्च झाला. म्हणजेच गेल्या दहा वर्षांत सलग दुसऱ्यांदा रोजगार हमी योजनेचे उद्दीष्ट पुर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कोकणात रोजगार हमी योजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण आयुक्त यांनी एक परिपत्रक काढले होते. या अंतर्गत कोकणातील पाच जिल्ह्यत रोजगार हमी योजने अंतर्गत २० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यात रायगड जिल्ह्यतील ४ हजार ५००हेक्टरचा समावेश होता. यानंतर अंतर्गत रस्ते, घरकुल, शोषखड्डे, विहिरीची बांधकाम, शेती खाचर, संरक्षक बंधारे, जलसंधारण यांसारखी काम रोजगार हमी योजनेतून घेण्यात आली. त्यामुळे योजनेला मिळणारा प्रतिसाद वाढला.

कोकणातील एकूण भौगोलिक क्षेत्रातच्या ३९ टक्के म्हणजे ११ लक्ष हेक्टर जमिन पडीक आहे. तर दुसरीकडे या विभागात अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या ८४ टक्के आहे. याचा विचार करून येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड मोहिम राबविण्यात आली. याअंतर्गत आंबा, काजू, नारळ, चिकू आणि बांबू लागवड करण्यात आली आहे. याचाही सकारात्मक परिणाम कोकणातील रोजगार हमी योजनेवर होत असल्याचे दिसून येत आहे.

* रोजगार हमी योजनेला चालना मिळावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो. यावर्षी त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. फळबाग लागवड योजना, घरकुल योजना, शोषखड्डे, अंतर्गत रस्ते यांसारखी कामे योजनेत समाविष्ट झाल्याने हा बदल दिसून आला आहे.’

-जगन्नाथ वेटकोळी , उपजिल्हाधिकारी रोहयो