सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे तक्रार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या विज्ञान शाखा द्वितीय वर्षांच्या परीक्षेतील ‘रेखाकृती बीजगणित’ या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची बाब उघडकीस आली. समाजमाध्यमावर ही प्रश्नपत्रिका काही विद्यार्थ्यांना रात्रीच मिळाल्याचा संशय आहे. या घटनाक्रमाची माहिती राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंकडे देत प्रश्नपत्रिका विद्यापीठ कार्यालयातून फुटल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

सध्या विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरू आहेत. शुक्रवारी रात्री काही विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर ही प्रश्नपत्रिका आल्याची तक्रार अ‍ॅड. अजिंक्य गिते आणि आपचे जितेंद्र भावे यांनी केली. शनिवारी पेपर सुरू झाल्यानंतर त्याची खातरजमा झाली. प्रश्नपत्रिका फुटल्याचे लक्षात आल्यावर संबंधितांनी विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रात धाव घेऊन तक्रार केली. परीक्षा नियंत्रकांनी कुलगुरूंशी संवाद साधला. कुलगुरूंनी हा प्रकार अमान्य केला. विद्यापीठ परीक्षेबाबत काळजी घेत असून कोणतीही प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी ऑनलाईन संकेतांक पध्दतीचा वापर होत असल्याचे सांगितले. मात्र, असे घडले असल्यास या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे अ‍ॅड. गिते, भावे यांनी म्हटले आहे. पेपरचे काय होणार, तो पुन्हा द्यावा लागणार काय, याची स्पष्टता झाली नसल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. ही प्रश्नपत्रिका विद्यापीठ मुख्यालयातून फुटल्याचा आरोप गिते यांनी केला. परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षेच्या दिवशी केवळ अर्धा तास आधी प्रश्नपत्रिका मिळते. असे असताना बीज गणिताच्या प्रश्नपत्रिकेचा संगणकीय ‘स्क्रिनशॉट’ समाज माध्यमांवर फिरविला गेल्याचा दावा त्यांनी केला.