हवामान विभागाचा अंदाज; दोन दिवसांत वळीव

पुणे : अनुकूल वातावरणानंतर कर्नाटकापर्यंत पोहोचलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाची प्रगती काहीशी मंदावल्याने तो कर्नाटकातच रेंगाळला आहे. मात्र, त्याच्या प्रगतीस पोषक वातावरण पुन्हा निर्माण होत असल्याने तो ६ ते ८ जून दरम्यान गोव्यासह महाराष्ट्रात दाखल होऊ शकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत राज्याच्या विविध भागामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.

अंदमानानंतर केरळमध्ये नियोजित वेळेला दाखल झालेल्या मोसमी पावसाने गुरुवारी (३१ मे) कर्नाटकपर्यंत मजल मारली होती. कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि दक्षिण कर्नाटकपर्यंत तो पोहोचला. पोषक हवामानामुळे तो वेगाने प्रगती करील असे वाटत असतानाच तो दिवसभर केरळमध्येच रेंगाळला. त्यामुळे तो पुढे सरकू शकला नाही. ही स्थिती लगेचच बदलणार आहे. शुक्रवारपासूनच मोसमी पावसासाठी पुन्हा पोषक स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये दक्षिण गोवा, उत्तर कर्नाटक, तेलंगणामध्ये तो दाखल होऊ शकेल.

देशाच्या दक्षिण भागात रविवारी (३ जून) मोसमी पाऊस प्रगती करण्याची शक्यता आहे. त्यानंतर तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये पाऊस पडणार आहे.  ६ जूननंतर महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊस जोर धरणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, २ आणि ३ जूनला दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकणात दुपारनंतर मेघगर्जना आणि वादळीवाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार आहे. विदर्भात मात्र अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. गुरुवारीही येथील स्थितीत बदल झाला नव्हता. बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४४ अंशांच्या पुढे नोंदविले गेले.