नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणादरम्यान विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करत पत्रके सभास्थळी फेकल्याचा प्रकार बुधवारी संध्याकाळी घडला. विदर्भवाद्यांच्या घोषणाबाजीमुळे संतापलेल्या गडकरींनी ‘शांत बसत नसतील तर त्यांना ठोकून काढा’, असे निर्देशच पोलिसांना दिले.

नागपूर-नागभीड गेज कन्व्‍‌र्हशन परियोजनेसह महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, मेट्रो, सार्वजानिक बांधकाम विभागाशी संबंधित २३ विकास कामांचे भूमिपूजन बुधवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. फुटाळा तलाव परिसरात हा कार्यक्रम पार पडला. गडकरी यांचे भाषण सुरु होताच विदर्भवाद्यांनी घोषणा देत पत्रके सभास्थळी फेकली. प्रेस बॉक्सच्या मागे बसलेल्या काही युवकांनी पत्रके हवेत भिरकावली. त्यात २०१४ मध्ये गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख होता. ‘गडकरींनी २०१४ दिलेले आश्वासन पूर्ण करावे, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे’, अशा घोषणा या युवकांनी दिला. युवकांच्या घोषणाबाजीमुळे गडकरी संतापले. शांत बसत नसतील तर त्यांना ठोकून काढा, असे निर्देश गडकरींनी पोलिसांना दिले. नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याचा आता निषेध होत आहे.

गडकरींच्या आदेशानंतर पोलिसांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यानी विदर्भवाद्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला. या पुढे नितीन गडकरी व मुख्यमंत्री जिथे जिथे जातील त्या त्या भागातील विदर्भवाद्यांनी विदर्भ केव्हा देता हा प्रश्न जाहीर सभेतुन विचारा आणि या प्रश्नांचे उत्तर नाही दिले तर त्यांचा जाहीर सभेत निषेध करा. आधी विदर्भ द्या, मग भाषण करा व विदर्भाच आश्वासन पूर्ण करा, असा इशारा समितीने दिला आहे.