गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्य़ातील आपल्या  गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे . रायगड जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवासाठी निर्बंध घातले आहेत .

मुंबई, पुण्यासह जिल्ह्य़ाच्या  बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना ७ ऑगस्ट पूर्वी जिल्ह्य़ात दाखल व्हावे लागणार आहे . त्याचबरोबर त्यांना पुढचे १ दिवस होम विलगीकरणात राहावे लागणार आहे. रायगडच्या् जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी खास गणेशोत्सावासाठी ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यामध्ये याचा समावेश आहे .

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज रायगड जिल्ह्य़ासाठी परिपत्रक जारी केले आहे .

त्यानुसार घरी विलगीकरणाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत . घरी विलगीकरण आदेशच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही करोना प्रतिबंधक समिती व सरपंच यांची राहील . रायगड जिल्ह्य़ात १५ हजारांच्या  आसपास नागरिकांना करोनाची लागण झाली आहे . जिल्ह्य़ासह राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहनदेखील करण्यात आले आहे .

याखेरीज गणेशमूर्तीच्या उंचीवरदेखील निर्बंध घालण्याात आले आहेत. घरगुती गणेशमूर्ती ही दोन फुटांची तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ४ फुटांपर्यंत उंचीची मूर्ती ठेवता येणार आहे .  गणेशोत्सवासाठी कुणी स्वेच्छेने वर्गणी किंवा देणगी दिल्यास स्वीकारता येईल. मात्र घरोघरी जावून वर्गणी मागता येणार नाही . भपकेबाज जाहीराती किंवा पोस्टरबाजी करू नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत . गणेश मंडपात निर्जतुकीकरणाबरोबरच निर्जंतुकीकरण, तापमान तपासणी व्यवस्था असावी तसेच दिवसातून किमान ३ वेळा मंडपाचे निर्जंतुकीकरण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.