विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीची ‘हल्लाबोल दिंडी’

कपाशीच्या बीटी बियाण्यांनी प्रतिकारक्षमता गमावली असली तरी बीटी बियाण्यांवर बंदी आणणे हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. जोपर्यंत बीटीला देशी बियाण्यांचा पर्याय शोधला जात नाही, तोपर्यंत बीटीची प्रतिकारशक्ती पूर्ववत कशी येईल, याचा विचार होणे जरुरीचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले.

विदर्भाच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांनी शुक्रवारी नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे श्याम उगळे या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन बोंडअळीने फस्त केलेल्या कपाशीची पाहणी केली. त्यानंतर यवतमाळात बळवंत मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले.

नागपूरचे कापूस संशोधन केंद्र तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन कृषी शास्त्रज्ञ व तज्ज्ञ शेतकऱ्यांचे शिबीर घ्यावे व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे सुचवले. कीटकनाशक फवारणीने शेतकरी-शेतमजुरांच्या झालेल्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यासंदर्भात सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्यची मागणी त्यांनी केली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना पवार म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था पूर्णत: खिळखिळी झाली आहे.

दौऱ्याचा हेतू पक्षसंघटन नाही

विदर्भातील आपला दौरा पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी नव्हता, तर धान, तूर, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेणे व ते सोडवण्याचे उपाय कोणते यासंदर्भात होता, असे  एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.  विदर्भात पक्षाच्या आमदारांची संख्या खाली आली आहे. आता आपले लक्ष्य काय आहे, असे विचारले असता आपला दौरा त्या दृष्टीने अजिबात नाही. वेळ येईल तेव्हा ठरवू, असे उत्तर पवारांनी दिले.

मुख्यमंत्री आपले ऐकत नाहीत.?

शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून शेतक ऱ्यांना मदत देण्यास सांगा कारण तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत, असे मांगलादेवी  येथे एका शेतकऱ्याने शरद पवार यांना सांगितले तेव्हा, ते म्हणाले, मुख्यमंत्री माझे ऐकत नाहीत. पण, माझ्या या वाक्याचा  वेगळा अर्थ लावू नका. मी राजकारण करायला आलो नाही. तर शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घ्यायला आलो आहे.

हल्लाबोल दिंडी

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ११ डिसेंबरला विधिमंडळ अधिवेशनावर नागपूर येथे शेतकऱ्यांची ‘हल्लाबोल’ दिंडी काढण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात १ डिसेंबरला यवतमाळातून होईल. समविचारी पक्षांनी दिंडीत सहभागी व्हावे, यासाठी आमची त्यांच्याशी बोलणी सुरू आहे, असे पवार यांनी सांगितले.