मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या आरोपावर भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. याबाबत शरद पवार यांनीच त्याचा विस्तृत खुलासा करावा, त्यांच्या खुलाशानंतर आम्हाला भूमिका मांडता येईल, कोणत्या विषयावरुन ते असे बोलले हे पवार यांनीच सांगितले पाहिजे, असे खडसे म्हणाले.

‘ओबीसी इंडिया फौंडेशन’च्या कार्यक्रमासाठी माजी मंत्री खडसे आज, रविवारी नगरमध्ये होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. जळगाव व सांगली महानगरपालिकांच्या निवडणुकीत मिळालेले यश हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. जळगावमध्ये भाजपाची आघाडी सुरेश जैन व शिवसेनेसोबत व्हावी, अशी काही जणांची निवडणुकीपूर्वीची इच्छा होती. मात्र, आपण निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला, युती वा आघाडी केली असती, तर मिळालेल्या विजयात सहकारी पक्ष सामील झाले असते. मात्र, आपल्या सूचनेनुसार जळगावमध्ये स्वबळावर निवडणूक पक्षाने लढवली आणि त्यातून मिळालेला विजय हा भाजपाचा ठरला आगामी लोकसभा निवडणुकीतही मागीलसारखेच भाजपाला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका पुढे येत असल्याकडे खडसे यांचे लक्ष वेधले, असता ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्यातील सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता न्याय हक्काचे आरक्षण मराठा समाजाला मिळावे ही पक्षाची भूमिका आहे. सरकारही त्या दृष्टिकोनातून सकारात्मक प्रयत्न करीत आहे. राज्य मागास आयोगाचा अहवाल येईपर्यंत वाट पहावी लागेल, असे खडसे म्हणाले न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय तत्पूर्वी सहकार सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावरून काढल्याची मनातील खदखद पुन्हा एकवार जाहीरपणे व्यक्त केली. खडसे यांच्या आधी शिवसेनेचे संघटक गोविंद घोळवे व प्रकाश शेंडगे यांनी आपल्या भाषणात खडसेंवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले होते. त्यावर खडसे यांनी, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा नाथाभाऊ भोगतोय मात्र, सत्ता व मंत्रिपदापेक्षा समाज महत्त्वाचा आहे. समाजासाठी मी बोलत राहणार आहे. ओबीसी समूहाच्या संदर्भात महाराष्ट्रात सर्वप्रथम स्व. गोपीनाथ मुंडे यांनीच निर्भयपणे भूमिका मांडली, ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का लागला तर जाब विचारण्यासाठी सर्वात अग्रभागी मी असेल.