देशात आणि राज्यात करोनाबरोबरच अनेक विषयावर राजकारण फिरत आहे. देशात गलवान व्हॅलीतील संघर्षावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. तर राज्यातही करोनाबरोबरच इतर मुद्यांवरून भाजपा महाविकास आघाडीवर टीका करत आहे. देशातील व राज्यातील सद्यस्थितीच्या अनुषंगानं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. “ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल,” असा दावा संजय राऊत यांनी मुलाखतीविषयी केला आहे.

देशातील व राज्यातील सद्य स्थितीवर भाष्य करणारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतली आहे. ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार असून, त्याविषयी संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. “देशाचे नेते शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होईल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल. शरद पवार चीनपासून महाराष्ट्रातील घडामोडीपर्यंत जोरदार बोलले,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

हे असू शकतात मुलाखतीतील मुद्दे?

सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी त्याचबरोबर अनेक मुद्यांवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. करोना बाधितांची वाढणारी संख्या, गलवान व्हॅलीतील संघर्ष, लॉकडाउन आदी विषयावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून मोदी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. तर राज्यातही करोनाबरोबरच मराठा आरक्षण, सारथी संस्थेचा वाद, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आदी मुद्यांभोवती राजकारण फिरताना दिसत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू होती असा गौप्यस्फोट केला होता. या एकूण पार्श्वभूमीवर शरद पवारांची मुलाखत होत आहे. राहुल गांधींकडून वारंवार सरकारला विचारले जाणारे प्रश्न, तसेच फडणवीसांनी केलेल्या आरोपाविषयी व राज्यातील सरकारच्या स्थिरतेबद्दल विचारण्यासंदर्भातही पवार भाष्य करू शकतात. त्यामुळे पवारांच्या मुलाखतीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.