देशात करोनानं शिरकाव केल्यानंतर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. करोना व लॉकडाउनमुळे अनेक नवे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासंदर्भात सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांना “हे जे संकट आपल्याला दिसतंय, देशातले आणि महाराष्ट्रातील ते संकट दूर करण्यासाठी समन्वयाची कमतरता कुठे दिसतेय का? आणि देशाला एका मनमोहन सिंग यांची गरज आहे का?”, असे प्रश्न राऊत यांनी विचारले. त्यावर पवार यांनी सरकारच्या सेटअपमधील उणीवा मांडल्या. त्याचबरोबर अर्थ धोरणावरही भाष्य केलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विशेष मुलाखत घेतली आहे. तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध केली असून, शनिवारी पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आला होता. आज दुसरा भाग प्रसिद्ध झाला असून, यात कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी करोना काळात केंद्र सरकारच्या समन्वयाविषयी व आर्थिक प्रश्न सोडवण्यासंदर्भातील धोरणांच्या मुद्यावरून प्रश्न विचारला.

“देशाला एका मनमोहन सिंग यांची गरज आहे का?” या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “शंभर टक्के गरज आहे. कारण मनमोहन सिंग जेव्हा पहिल्यांदा केंद्रीय अर्थमंत्री झाले. तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. मला माहिती आहे, त्यावेळी आर्थिक अडचणीतून आम्ही कसे जात होतो. पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. त्याला दोन कारण आहेत. मनमोहन सिंगांनंतर मी नरसिंहरावांना श्रेय देतो. कारण या दोघांनी नेहमीच्या चौकटीतला रस्ता बदलून वेगळ्या वळणावर गाडी नेली आणि संपूर्ण अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती. तशा प्रकारच्या लोकांची मदत घेऊन पंतप्रधान मोदी यांनी तशा दृष्टीनं पावलं टाकण्याची काळजी घ्यावी आणि त्या गोष्टींसाठी माझी खात्री आहे की, देश सहकार्य करेल,” असा सल्ला शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला.

“तिथे आम्हाला कमतरता दिसते…”

“मला असं दिसतंय की, पंतप्रधानांनी एकदोन वेळ बोलणी केली. इतर पक्षांच्या, पण या संकटाची व्याप्ती आणि स्वरूप इतकं मोठं आहे की ते कुठल्या तरी एका पक्षानं, एका विचारानं हे सगळं आपण सोडू शकू ही भूमिका घेऊन चालणार नाही. यावेळेला ज्यांची ज्यांची होणं शक्य आहे. उपयुक्त आहे. त्या सगळ्यांना बरोबर घेण्यासंबंधी प्रयत्न केला पाहिजे. आज मोदी यांचा सेटअप आहे, त्या सेटअपमध्ये अनेक सहकारी असे आहेत की, या अशा संकटाच्या कामामध्ये एक तर अनुभव त्यांना नाही. आम्हाला पण नाही. कारण असं संकट आपण पाहिलंच नव्हतं. पण, या संकटावर मात करण्यासाठी ज्या प्रकारची पावलं टाकायला हवी. सगळ्यांची साथ घेतली पाहिजे. तिथे आम्हाला कमतरता दिसते”, असं शरद पवार म्हणाले.

“माझी कधी अर्थमंत्र्यांशी भेटही झाली नाही…”

“तुम्ही या विषयावर देशाच्या अर्थमंत्र्यांशी कधी चर्चा केली का?”, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “माझी कधी भेटही झाली नाही. एकदाही भेट झाली नाही. कधी असं बोलणंही झालं नाही आणि असे प्रश्न, देशाची अर्थव्यवस्था संकाटात आहे. त्यावेळी संवाद असला पाहिजे. तो संवाद नाही. काही लोकांच्या कामाची पद्धत असते. ते त्यांच्याप्रमाणे… प्रणव मुखर्जी होते अर्थमंत्री किंवा चिदंबरम होते किंवा मग मनमोहन सिंग होते. अनेक वेळा मी पाहायचो, ते अन्य पक्षांच्या किंवा अन्य जाणकारांसोबत तासनतास बसत आणि त्यांची मतं घेत असतं. आता घेतात की नाही, मला माहिती नाही. कारण आमच्या बाकीच्या लोकांना ती सवय… वेगळ्या विचाराचा प्रवेश दिसत नाही. त्यामुळे घेतात की नाही ते माहिती नाही किंवा घेत असतील, तर त्याचे परिणाम कुठे दिसत नाहीत”, असं शरद पवार म्हणाले.