एकनाथ खडसे यांनी गोपीनाथगडावरुन त्यांच्या मनातली खदखद जाहीर केली. पंकजा मुंडे भाजपामध्येच राहणार आहेत मात्र माझा काही भरवसा नाही असं सूचक वक्तव्यही एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्यानंतर एकनाथ खडसे काय करणार? याची चर्चा रंगली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशीही चर्चा होती. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यावर अशा चर्चाही रंगल्या. “एकनाथ खडसे मला भेटले. त्यांनी त्यांच्या मनात काय आहे ते बोलूनही दाखवलं. मात्र त्यांचं समाधान होईल अशी साधनसामग्री माझ्याकडे नाही” असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या वाटा बंद झाल्या का? असाही प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे.

एकनाथ खडसे हे भाजपावर किती नाराज आहेत हे गोपीनाथ गडावर दिसलंच. मात्र राष्ट्रवादीत जातील की नाही या चर्चांचं उत्तर आता शरद पवार यांनीच दिलं आहे. दोन दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. एवढंच नाही तर अजित पवार यांनीही एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये येणार असतील तर स्वागतच आहे असं म्हटलं होतं. दरम्यान या सगळ्या गोष्टींचा वेगळा अर्थ काढू नका असं एकनाथ खडसे यांनीही सांगितलं होतं. इतकंच नाही तर मी पक्षावर नाराज नाही पक्षातल्या काही लोकांवर नाराज आहे. त्यांची नावं मी पक्षश्रेष्ठींकडे दिली आहेत. मात्र पक्षाने कारवाई केली नाही तर विचार करु असंही खडसे म्हणाले होते.

दरम्यान या सगळ्या गोष्टी सुरु असताना औरंगाबाद या ठिकाणी शरद पवार यांना एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत विचारलं असता होय आमची चर्चा झाली मात्र त्यांचं समाधान होईल अशी सामग्री माझ्याकडे नाही असं उत्तर शरद पवार यांनी दिलं.