करोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे शहापूर तालुक्यावरील करोनाचे संकट अधिक तीव्र होत चालले आहे. शनिवारी तब्बल पाच रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून यात एका महिलेचा समावेश आहे. यानंतर तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६ वर पोहोचली आहे. यापैकी एका रुग्णाचा आठ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता.

तालुक्यातील वासिंद येथील दोन, शहापुरातील दोन व शेलवली (किन्हवली) येथील एक असे एकूण पाच रुग्ण सापडले आहेत. शहापुरच्या फिवर क्लिनिकमध्ये स्वॉबचे नमूने घेण्यात आले होते. त्यामध्ये या पाचही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, हे पाचही रुग्ण मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे समजते.

तालुक्यात वासिंद येथे सात, शहापूर, गोठेघर, खरीड व कसारा येथील प्रत्येकी १ असे ११ रुग्ण ठाणे व भिवंडी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर शनिवारी यात ५ रुग्णांची भर पडली. यानंतर करोना बाधितांची एकूण संख्या १६ वर पोहोचली असल्याची माहिती तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी दिली. बाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरात कडक लॉकडाउन पाळण्यात येणार असून औषधांची दुकाने आणि दवाखाने वगळता सर्व बंद ठेवण्यात येणार आहे.