साईबाबांच्या जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादामुळे उद्या शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्या भागाचे लोकप्रतिनिधी या नात्याने आज राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. परभणी जिल्ह्यात पाथरीला साईबाबांचे जन्मस्थान घोषित करण्याची मागणी होत आहे त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे.

मुख्यमंत्र्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली. बाबांच्या जन्मस्थळाबद्दल पाथरीत कोणतेही पुरावे नाहीत. ब्रिटिशकाळातही वाद झाला पण त्याचे पुरावे मिळाले नाहीत. साईंच्या जन्मस्थळाचा वाद वाढवू नये. कोटयावधी साई भक्तांच्या भावना दुखावल्या त्याची दखल सरकारने घ्यावी. साई संस्थानने पुढाकार घेऊन गैरसमज दूर करावा असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून शिर्डी बंदला माझा पाठिंबा आहे. शिर्डी बंद राहणार असले तरी, साई मंदिर आणि भक्तनिवास खुले राहणार आहे. २५ गाव या बेमुदत बंदमध्ये सहभागी होतील. हॉटेलमध्ये बुकिंग केलेल्या नागरीकांची तसेच विमानाने येणाऱ्याची कुठलीही गैरसोय होणार नाही फक्त बाजार बंद राहील. अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आले आहे अशी माहिती विखे-पाटील यांनी दिली.