राज्य सरकारने शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी पद्धतीने कालगणनाही केली जात नव्हती. तेव्हा महाराजांची जयंती ही मराठी तिथीप्रमाणेच साजरी व्हायला हवी, ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडू. तसेच या भेटीत औरंगाबादच्या नामांतराचा आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या समांतर जलवाहिनीचा प्रश्न देखील मांडणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचे निश्चित झाले होते. हरिभाऊ बागडे आणि मी त्याबद्दलचा ठराव मांडला होता. त्याला मान्यताही देण्यात आली होती. मात्र, राज्यात सरकार नसल्यामुळे अंमलबजावणी झाली नाही. आता दोन्हीकडे सरकार आहे. त्यामुळे निराशा व्हायला नको, असे खैरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत १७ तारखेला माझी बैठक आहे. या बैठकीत मी दहा मुद्द्यांना विशेष प्राधान्य देणार आहे. यामध्ये शहराच्या नामांतराचा मुद्दा अग्रस्थानी आहे. त्याबद्दल अतिरिक्त सचिवांसोबत मी चर्चाही केली आहे. मात्र, त्यांनी तसा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितलं. हा मुद्दा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्यामुळे शिवसेनेला कमी महत्त्व मिळावं, असा डावही यामागे असू शकतो, अशी शक्यता खैरे यांनी वर्तवली.

माझ्या घरी सहा दिवसांनी पाणी येतं…
शहरात पाण्याची बिकट परिस्थिती आहे. माझ्या घरीही सहा दिवसांनी पाणी येते. सर्वांना नियमित पाणी मिळण्यासाठी समांतर जलवाहिनीच काम व्हायला हवं. समांतर जलवाहिनीला असणारा भाजपचा विरोध मावळला का, असा प्रश्नही यावेळी खैरेंना विचारण्यात आला. त्यावर खैरेंनी म्हटले की, शहराला पाण्याची गरज आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून योजना बंद करण्यात आली होती. मात्र, आता पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे समांतर जलवाहिनीची मागणी होत आहे. ज्या एसएल ग्रुपची ही योजना आहे, त्याची मालकी भाजपा खासदार सुभाष चंद्रा यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून योजनेसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.