नाणार  रिफायनरी प्रकल्प शिवसेना लादणार नाही. या प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, असे उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांनी पक्षाचे नाव स्वाभिमान नव्हे तर स्वार्थाभिमान पक्ष ठेवावे, असा टोलाही सुभाष देसाई यांनी मारला.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात उद्योगमंत्री   सुभाष देसाई बोलत होते. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार रवींद्र फाटक, अरुण दुधवडकर, तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव साहेबांचा ज्या दिवशी आदेश येईल, त्या ठिकाणी शिवसेना सत्ता सोडणार आहे. आम्ही मंत्रिपदासाठी हपापलो नाही, असे बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

कोणी गेले म्हणून शिवसेना संपली नाही, त्याउलट ज्यांनी गद्दारी केली त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने संपविले, असे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. निवडणूक असो अथवा नसो, शिवसैनिक जनतेच्या सेवेसाठी हजर आहे. कणकवली, कोकणातील प्रश्न शिवसेना सोडविणार असे एकनाथ शिंदे म्हणाले.

भविष्यात विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर कणकवली नगरपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे गटातटाचे राजकारण करू नका, तर उद्धव साहेबांच्या आदेशाने एकदिलाने काम करा, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला. त्यांनी पक्षाचे नाव स्वार्थाभिमानच ठेवायला हवे. नारायण राणे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले, असे ते म्हणाले.

ज्या दिवशी राणेंना मंत्रिमंडळात घेतील, त्याच दिवशी शिवसेना सत्तेला लाथ मारणार, असे भाजपला समजले. त्यामुळे त्यांना दिल्लीत पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे मंत्री  सुभाष देसाई म्हणाले. मंत्रिपद सोडेन, पण नाणार लादणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सिंधुदुर्गात वाळूमाफियांची लूट थांबविण्यासाठी कडक उपाययोजना करणार असे पालकमंत्री  दीपक केसरकर म्हणाले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार रवींद्र फाटक आदींनी विचार मांडले.