औरंगाबाद : नाणारचा प्रकल्प लोकविरोधी ठरवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याला विरोध करीत आहेत. मग त्यांच्याच पक्षाने २०१४ मध्ये लादलेल्या समांतर पाणीपुरवठय़ाचा खासगीकरणाचा प्रस्ताव त्यांनी मान्य कसा केला, असा सवाल शहर पाणीपुरवठा खासगीकरणविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे. घरगुती पाणीपुरवठय़ाचे खासगीकरण करून १८०० रुपयांची पाणीपट्टी ४०५० रुपयांपर्यंत वाढवून ठेवण्यात आली आहे. एवढी पाणीपट्टी असणारे औरंगाबाद हे एकमेव शहर आहे.

पुणे शहराची वार्षिक पाणीपट्टी १४०० रुपये आहे. नाशिकमध्ये २०१६ पर्यंत पाणीपट्टीचा वार्षिक दर १२०० रुपये होता. औरंगाबादमध्ये मात्र पाणीपुरवठय़ाच्या खासगीकरणासाठी खास कंत्राटदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्या विरोधात प्रा. विजय दिवाण, प्रदीप पुरंदरे, राजेंद्र दाते पाटील अशा व्यक्तींनी आवाज उठविल्यानंतर औरंगाबादमध्ये जनजागृती झाली. परिणामी समांतर पाणीपुरवठय़ाचा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीबरोबर केलेला करार रद्द करावा लागला. हा करार कसा वाईट आहे, हे भाजप आणि सेनेतील सदस्य घसा फोडून एकमेकांना सांगत असे. सर्वसाधारण सभेत त्यावरून नेहमी खडाजंगी होत. खासगी कंत्राटदाराकडून करण्यात येणाऱ्या वसुलीवरून बराच गदारोळ झाला. अगदी मीटर अधिक दराने बसविण्यापासून ते पाणीपट्टी वसुलीपर्यंतचा कंत्राटदाराचा कारभार वादग्रस्तच राहिला. या काळात हे लोकविरोधी कंत्राट रद्द व्हावे, अशी सतत मागणी करावी लागली. आता पुन्हा समांतर पाणीपुरवठय़ाच्या योजनेसाठी नव्याने कंत्राटदाराबरोबर बोलणी सुरू झाली आहे. विकासाचे प्रकल्प लोकविरोधी असेल तर ते होऊ देणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे घेत आहेत. जर नाणार प्रकल्प लोकविरोधी वाटत असेल तर समांतर जलवाहिनीचा प्रकल्प लोकांच्या बाजूचा आहे का, असा सवाल विजय दिवाण यांनी केला आहे. शिवसेनेची ही भूमिका दुटप्पी असल्याचे दिसून येत आहे, असेही दिवाण यांनी म्हटले आहे.

समांतरची चर्चा सुरू झाल्यानंतर शहरात होणारा पाणीपुरवठा कसा अपुरा आहे, हे नगरसेवकांच्या अलीकडेच लक्षात आले आणि त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून निषेधही नोंदवला. समांतर पाणीपुरवठय़ाच्या कराराची चर्चा सुरू झाली की, औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक होतात, असे दिसून येत असल्याचे पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने बोलताना समांतर जलवाहिनी करारातील अनेक मुद्दे हे लोकविरोधी आहे. पण ‘नाणार’ जाणार आणि ‘समांतर’ येणार या दोन परस्परविरोधी भूमिका शिवसेना घेत असल्याचे दिसून येत आहे.