अहमदनगरमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. अहमदनगरमधील पोटनिवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन शिवसेनेला शह दिला. दोन्ही शिवसैनिकांच्या हत्येमागे या तिन्ही पक्षांचा हात असून अशी घटना तर उत्तर प्रदेशमध्येही घडत नाही. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थाच नाही, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली. एकीकडे युती हवी सांगायचे आणि दुसरीकडे शिवसेनेच्या मुळावर घाव घालायचा हे भाजपाचे जुने धंदे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

अहमदनगरमधील केडगाव येथे शनिवारी संध्याकाळी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. संजय कोतकर (वय ५५) आणि वसंत ठुबे (वय ४०) अशी या मृतांची नावे आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी अहमदनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली. केडगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी रामदाम कदम यांनी नगर जिल्ह्याला भेट दिली.

रविवारी दुपारी रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका केली. पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांच्या संगनमतानेच ही घटना घडली असून शिवसेना कोणत्याही परिस्थितीत या गुन्हेगारांना मोकाट सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपाने एकत्र येऊन शिवसेनेला शह दिला. भाजपाचे खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे आहेत, अशी टीका त्यांनी केली. या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केली होती. याचा दाखला देताना रामदास कदम यांनी गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्यात कायदा व सुव्यवस्थाच नसून अशी घटना तर उत्तर प्रदेशमध्येही घडत नाही, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.

कोतकर आणि ठुबे यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेना घेईल, त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. आम्ही या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. शिवसेना पक्षनेतृत्वानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.