News Flash

नरेंद्र मोदींच्या ५६ इंचाच्या छातीत शौर्य नाही: उद्धव ठाकरेंचा घणाघात

गडकरींचे नौदलाबाबतचे वक्तव्य संतापजनक

उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

नुसती ५६ इंचाची छाती असून उपयोग नाही. त्या ५६ इंचाच्या छातीत शौर्यच नसेल तर काय उपयोग असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप ज्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून सत्तेवर बसला आहे त्या पक्षाचे (पीडीपीचे) आमदार दहशतवाद्यांचा उल्लेख ‘आमचे भाऊ’ म्हणून करतात. त्यावर भाजप काही बोलत नाही, असेही ते म्हणालेत. मोदींनी अहमदाबादमध्ये जम्मू- काश्मीरमध्ये रोड शो केला असता आणि लाल चौकात तिरंगा फडकावला असता तर मी स्वतः मोदींचे कौतुक केले असते, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुकीची औपचारिकता मंगळवारी पार पाडली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ‘आदित्यला शिवसैनिकांनी नेतेपदी बढती दिली. तुम्ही याला घराणेशाही म्हणा किंवा नका म्हणू. पण ठाकरे घराण्याला जनतेची सेवा करण्याची परंपरा लाभली आहे. आमच्या घरातील पुढची पिढी मी तुमच्या सेवेत देत आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

सरदार वल्लभभाई पटेल हे फक्त बोलणारे नेते नव्हते. ते कृतीही करायचे. त्यांनी काश्मीर, पाकिस्तान आणि बांगलादेशचाही प्रश्न मिटवला असता, असा दावा त्यांनी केला. मोदी म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात आहेत. निवडणूक आल्यावर या मंडळींना पाकिस्तानची आठवण येते, असा चिमटा देखील त्यांनी काढला. ‘नौदलाला मुंबईत जागा देणार नाही, त्यांनी सीमेवर जावे’ असे विधान नितीन गडकरी यांनी केले होते. याचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. राज्यकर्त्यांच्या मनात मस्तवालपणा घुसला आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने अन्य राज्यात निवडणूक लढवली नाही. मात्र आता शिवसेना प्रत्येक राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल, असे त्यांनी सांगितले.

वाचा: गाय मारण्याप्रमाणेच थापा मारणंही पापच: उद्धव ठाकरे

लिमलेटच्या गोळ्या मारता का?
उद्धव ठाकरेंनी पाकवरुन मोदी सरकारला खडे बोल सुनावले. ते म्हणाले, पाकिस्तानबाबत आपण दरवेळी हेच ऐकतो की त्यांनी एक मुंडकं उडवल की आपण १० मुंडकी उडवू. एक गोळी मारली तर १० गोळ्या मारु. पण कसल्या गोळ्या मारणार तुम्ही, लिमलेटच्या. नुसत्या धमक्या देण्याऐवजी एकदा पाकमध्ये घुसून कारवाई करावीच, असे ठाकरेंनी सांगितले. सीमेवर रोज जवान शहीद होतात, हा सर्व प्रकार बघून संताप येतो. सरकारने सीमेवरील सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेऊ नये, असेही ते म्हणालेत.

पतंग उडवण्याऐवजी लाल चौकात तिरंगा फडकवा
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना मोदींनी अहमदाबादमध्ये नेले. तिथे मोदी पतंग उडवत होते. पण त्याऐवजी मोदींनी  नेत्यानाहूंसोबत लाल चौकात जाऊन तिरंगा फडकावला असता तर अभिमान वाटला असता, असे त्यांनी सांगितले.

…मग सरकार सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय कशाला घेते; उद्धव ठाकरेंचा गडकरींना सवाल

अदृश्य हातांची होळी केल्याशिवाय राहणार नाही
भीमा कोरेगावमधील घटना दुर्दैवी आहे. भीमा कोरेगावमधील हिंसाचारामागे अदृश्य हात असल्याचे सांगितले जाते. पण स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तुम्ही मराठी माणसांची घरं जाळणार असाल तर त्या अदृश्य हातांची होळी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 1:04 pm

Web Title: shiv sena national executive meeting in mumbai party chief uddhav thackeray slams bjp narendra modi
टॅग : Shiv Sena
Next Stories
1 बाळासाहेबांच्या स्मारकाऐवजी एखादं रुग्णालय बांधा; एमआयएमची मागणी
2 एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांचे सदस्यत्व रद्द होणार
3 मिरचीचा ‘ठसका’!
Just Now!
X