महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतोष मासोळे, धुळे</strong>

आगामी विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला प्रत्यक्षात धुळ्यात आपली ताकद किती आहे, याची जाणीव महानगरपालिका निवडणुकीतून होणार आहे. महापालिका अस्तित्वात आल्यानंतरच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत पटकावलेल्या २३ जागा सोडल्या तर पुढील काळात सेनेच्या संख्याबळात सातत्याने घसरण झाली आहे. पक्षांतर्गत कलह थोपविण्यासाठी वरिष्ठांना अलीकडे पदांची खिरापत वाटावी लागली. या स्थितीत भाजपसह इतर विरोधकांशी संघर्ष करताना स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत राजकारण कळीचा मुद्दा ठरणार आहे.

धुळे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेनाही तयारीला लागली आहे. भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणापासून सेनेचा बचाव करण्यात पदाधिकाऱ्यांची बरीच शक्ती खर्च होईल. निवडणुकीच्या तोंडावर सेनेच्या जवळपास ३५ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला. त्यात दोन विभाग प्रमुख आणि काही उपविभाग प्रमुखांचा समावेश आहे. देवपूर विभागातही तो कित्ता गिरविला जाणार असल्याचे संकेत असून सेनेच्या संघटनात्मक बांधणीवर त्याचा परिणाम होईल. मात्र, पक्षाला त्याबाबत काही देणेघेणे नाही, असे चित्र आहे. ‘अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्याय सहन करायचा नाही’  हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीद काही पदाधिकाऱ्यांच्या अगदी नसानसात भिनलेले आहे. त्याची प्रचीती सेनेच्या अनेक बैठकांतून येते. पण हा संघर्ष सामान्य शिवसैनिकांकडून झाला तर मात्र त्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. उपद्रवमूल्य ज्याचे अधिक, त्याचे पक्षात महत्त्व अधिक, हा अलिखित नियम धुळ्यात कधी लागू झाला हे कोणाला सांगता येणार नाही. त्यात पक्षाचे मोठे नुकसान झाले. पण, याबद्दल कोणाला खंत नाही. कधीकाळी शहरात सेना मजबूत होती. अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत २३ जागा जिंकून शिवसेनेने महापालिकेत भगवान करनकाळ यांच्या रूपाने पहिले महापौरपद मिळविले होते. पुढे हे महापौरपद टिकविणे दूर, पण तेव्हा मिळालेल्या जागांच्या आसपासही सेनेचे आजचे संख्याबळ पोहोचू शकलेले नाही.

शिवसेनेचे महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी यांनी मध्यंतरी पक्षाची कोंडी केली होती. निष्ठावान शिवसैनिकांचा स्वतंत्र गट तयार करून त्यांनी पक्षात वेगळी चूल मांडली. प्रमुख आणि वर्दळीच्या ठिकाणी भलेमोठे फलक झळकावत निष्ठावान शिवसैनिक म्हणून शिवसेनेतील दोन गटांचे जाहीर प्रदर्शन झाले. आजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी सर्वश्रुत आहे. याचा परिणाम मागील निवडणुकीवर झाल्याचा निष्कर्ष खुद्द सेनेचे पदाधिकारी काढतात. गेल्या निवडणुकीत ११ जागांवर सेनेचे उमेदवार विजयी झाले. त्यातील एका नगरसेविकेने राजीनामा दिला. पोटनिवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने खेचून घेतली. अन्य ठिकाणी सेनेचे नगरसेवक संजय जाधव आणि आणखी एका नगरसेविकेने पक्षाचा राजीनामा दिला. या घटनाक्रमाने महापालिकेतील संख्याबळ नऊवर आले.

धुळ्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप आणि शिवसेना आपापल्यापरीने झटत आहे. भाजपने राज्यात जयकुमार रावल तर केंद्रात डॉ. सुभाष भामरे यांना मंत्रिपदे दिली. शिवसेनेने दादा भुसे यांच्याकडे धुळ्याचे पालकत्व सोपवत समतोल साधला. पण, गेल्या चार वर्षांत भुसे यांनी पक्ष वाढीसाठी ठोस काम केल्याचे दिसत नाही. महापालिका निवडणुकीची तयारी सुरू असताना भूखंड प्रकरणात सेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले यांना अटक झाली.

यामुळे शिवसेनेच्या प्रतिमेला तडा गेला. या कारवाईविषयी इतर पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगणे पसंत केले. पक्षाने महाले यांना पदावरून हटविले. विद्यार्थी सेनेकडून पक्षाला प्रचारात पाठबळ मिळू शकेल. महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी हे भाजपची केवळ सूज झाल्याचे सांगून ती धुळ्यात उतरेल, असा दावा करतात. सर्व २२० ठिकाणी बूथ प्रमुखांची नेमणूक झाल्याचा दाखला दिला जातो. भाजपमधील शिगेला पोहोचलेल्या मतभेदांचा शिवसेना लाभ उठवते की सेनेतील अंतर्गत कलह भाजपसह इतर पक्षांच्या पथ्यावर पडतात हे निकालातून समजणार आहे.

शिवसेना स्वबळावर लढणार

आहे. यासाठी चाचपणी सुरू आहे. प्रतिस्पर्धी पक्षांना फारसा प्रतिसाद मिळणार नाही. महापालिकेतील संख्याबळ कसे वाढेल यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

– हिलाल माळी, जिल्हाप्रमुख, शिवसेना

भाजप आणि शिवसेना धुळ्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी  झटत आहेत. भाजपने राज्यात जयकुमार रावल तर केंद्रात डॉ. सुभाष भामरे यांना मंत्रिपदे दिली. शिवसेनेने दादा भुसे यांच्याकडे धुळ्याचे पालकत्व सोपवत समतोल साधला. पण, गेल्या चार वर्षांत भुसे यांनी पक्ष वाढीसाठी ठोस काम केल्याचे दिसत नाही. भाजपमधील मतभेदांचा शिवसेना लाभ उठवते की सेनेतील अंतर्गत कलह भाजपसह इतर पक्षांच्या पथ्यावर पडतात हे निकालातून स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena workers resign ahead of municipal elections in dhule
First published on: 12-09-2018 at 01:27 IST