लोकसभेच्या विशेष सत्रात नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यात शिवसेनासह महाराष्ट्रातील इतर पक्षांच्या काही खासदारांनीही खासदारकी आणि गोपनियतेची शपथ मराठी भाषेत घेतली.

१७ वी लोकसभेच्या अधिवेशनाला आज सोमवारपासून (१७ जुन) सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवीन खासदारांचा शपथ विधी कार्यक्रम घेण्यात आला. या शपथ विधी कार्यक्रमात विविध राज्यातून निवडून आलेल्या खासदारांनी त्यांच्या भाषेत शपथ घेतली. भाजपाच्या अनेक खासदारांनी संस्कृत आणि हिंदी भाषेतून शपथ घेतली.

मनोज कोटक, विनायक राऊत, ओमप्रकाश निंबाळकर, प्रितम मुंडे, सदाशिव लोखंडे, नवनीत कौर राणा , इम्तियाज जलील, श्रीरंग बारणे यांच्यासह अन्य खासदारांनी मराठीतून शपथ घेतली.

पूनम महाजन, सुप्रिया सुळे, गावित, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, गोपाळ शेट्टी ह्यांनी हिंदीतून शपथ घेतली तर सुजय विखे, उदयनराजे भोसले ह्यांनी इंग्रजीमधून तर उन्मेश पाटील, सुनील मेंढे ह्यांनी संस्कृत मधून शपथ घेतली.

दरम्यान सोशल मीडियावर #मराठीतशपथ अशा हॅशटॅग ट्रेण्ड झाला होता. महाराष्ट्रातील सर्व ४८ नवनिर्वाचित खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी अशा मागणीनं जोर धरला होता. मात्र, काही खासदारांनी हिंदी, संस्कृत आणि इंग्रजीमधून शपथ घेतल्यामुळे सोशळ मीडियावर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.