७४वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले, त्याचबरोबर मोदी यांनी राष्ट्राला संबोधितही केलं. मोदी यांनी ९० मिनिटं केलेल्या भाषणावरून शिवसेनेनं निशाणा साधला आहे. करोनामुळे देशात निर्माण झालेल्या स्थितीकडे लक्ष वेधत पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या अर्थव्यस्थेला गती देण्याचा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे. “आजच्या कोरोना महामारीने देशासमोर जे आर्थिक महासंकट उभे राहिले आहे त्याचे काय? फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तत्काळ सुटेल असे वाटत नाही. आतापर्यंत देशात 14 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे; पण घराबाहेर पडून काय करायचे?,” असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. पंतप्रधानांच्या भाषणातील विविध मुद्यांचा हवाला देत शिवसेनेनं चिमटेही काढले आहेत. ” पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरून जे भाषण केले ते त्याच पद्धतीचे होते. पाकिस्तान किंवा चीनला त्यांचे नाव न घेता इशारे वगैरे देण्याचे सोपस्कार त्यांनी पार पाडले. ते नित्याचेच क्रियाकर्म आहे. चीन अद्यापि आपल्या भूमीत घुसलेलाच आहे. पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. जम्मू-कश्मिरात जवानांची बलिदाने आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. पंतप्रधानांचे भाषण सर्वसमावेशक होते. कोरोनामुळे समोर गर्दी कमी होती. त्यामुळे प्रमुख मंडळींच्या चेहऱयावरचे भाव ‘मास्क’मुळे समजणे कठीण होते; पण पंतप्रधानांचा आवेश, जोश कमी झाला नव्हता.” अशी टीका शिवसेनेनं केली.

“देशात कोरोनाचा कहर झाला आहे. गेल्या २४ तासांत ६३ हजार ४८९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर हजाराच्या आसपास लोक काल दिवसभरात मरण पावले. एका दिवसातला हा आक्रोश आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पंचवीस लाखांवर पोहोचली व आतापर्यंत पन्नास हजारांवर लोक या महामारीत मरण पावले. हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी ‘लस’ येत आहे, असे लाल किल्ल्यावरून सांगणे आशादायक आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या तीन लसी जोपर्यंत बाजारात येत नाहीत तोपर्यंत हिंदुस्थानातील भय संपणार नाही. प्रत्येक नागरिकाला डिजिटल हेल्थ कार्ड दिले जाईल, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची स्थापना होईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. या आरोग्य ओळखपत्रात डॉक्टरांच्या भेटीपासून ते औषधोपचारांपर्यंत सर्व काही असेल. हे सर्व डिजिटल प्रकरण छानच असावे; पण आजच्या कोरोना महामारीने देशासमोर जे आर्थिक महासंकट उभे राहिले आहे त्याचे काय? फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तत्काळ सुटेल असे वाटत नाही. आतापर्यंत देशात १४ कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे; पण घराबाहेर पडून काय करायचे? नोकरीधंदा, रोजगार गेला आहे. त्यांच्या भविष्यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर बरे झाले असते,” असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे.

…या स्वदेशी संकटाचा सामना करण्यासाठी सैन्य बोलवावे लागेल

पंतप्रधानांनी ९० मिनिटे म्हणजे दीड तास भाषण केले. आम्हाला आव्हान देणाऱ्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास आपला देश सक्षम आहे. हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहणाऱयांना, देशाच्या अखंडतेवर प्रहार करू पाहणाऱयांना ‘एलओसी’ ते ‘एलएसी’ असे हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले व स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून सांगितले म्हणजे त्यावर विश्वास ठेवायलाच हवा. दुश्मनांचे वाकडे डोळे बाहेर काढण्यासाठी सैन्य, हवाई दल वगैरे आहे; पण देशात जे भूकमरी व बेरोजगारीचे संकट तसेच आर्थिक मंदीचा राक्षस धुमाकूळ घालतो आहे त्याच्याशी मुकाबला कसा करणार? हे संकट आजही घरात निपचीत पडून आहे. ते उपाशी पोटाची आग घेऊन घराबाहेर पडेल तेव्हा या स्वदेशी संकटाचा सामना करण्यासाठी सैन्य बोलवावे लागेल अशी चिंता आम्हाला सतावत आहे. कोट्यवधी चुली विझताना दिसत आहेत, त्याच वेळी घराघरात भुकेचा आगडोंब उसळताना दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानात असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवताना व्यक्त केले. जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या. स्वातंत्र्य दिन येतो व जातो, लाल किल्ला तोच आहे, प्रश्न आणि दुःख तेच आहे,” असा टोला शिवसेनेनं पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.