राज्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता विविध परीक्षांबाबत विद्यार्थी तसेच पालकवर्गात संभ्रमावस्था आहे. दररोज राज्य सरकारकडून नवनवीन माहिती दिली जात आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत असताना, आता वैद्यकीय परीक्षांचा मुद्दा देखील समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून चिंता व्यक्त केली आहे. तसेच, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

“राज्यभरात कोविड१९ चा प्रादुर्भाव झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. या परिस्थितीत दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होत आहेत. परंतु सुमारे ४५० विद्यार्थी व तेवढेच पालक करोनाग्रस्त आहेत. याशिवाय अभ्यासाची साधने विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध नाहीत. जवळपास ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत करोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. हे लक्षात घेता वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आपणास विनंती आहे की, कृपया या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन परीक्षांबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा.” असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात – शेलार

या अगोदर राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावीची परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परीक्षा घ्याव्यात, असे मत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं होतं.