News Flash

शिक्षकी पेशातील शेतकऱ्याची वाइन उद्योगात भरारी

वाइनचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी प्रियंका सावे यांनी वाइन परीक्षणा संदर्भातील अभ्यासक्रम उत्तीर्ण केला.

(संग्रहित छायाचित्र)

नीरज राऊत

बोर्डीच्या श्रीकांत सावेंकडून चिकू, आंबा, अननसापासून वाइनचे तंत्र विकसित

जिल्ह्य़ातील निसर्गरम्य बोर्डी गावातील श्रीकांत सावे या मूळ शिक्षकी पेशातील शेतकऱ्याने पर्यटन व्यवसायात पाय रोवतानाच चिकू, आंबा, अननस आदी विविध फळांपासून वाइन तयार करण्यापर्यंत भरारी घेतली आहे.

घोलवडच्या प्रसिद्ध असलेल्या चिकू तसेच आंबा, अननस या फळांबरोबरच दालचिनी आणि मधापासूनही वाइन बनवण्याचे तंत्र  त्यांनी विकसित केले आहे. मुंबईसह पुणे, नागपूर आणि इतर शहरांमध्ये या वेगवेगळ्या फळांपासून तयार केलेल्या वाइनला विशेष मागणी असून घोलवड बोर्डी परिसरात वाइन पर्यटनाला चालना देण्याचा सावे कुटुंबीयांचा मानस आहे.

१९७६च्या सुमारास पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात शिकत असताना घरी परतण्यास गाडी नसल्याने फावल्या वेळेत सावे यांनी पालघर येथील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम सुरू केले. १९८०मध्ये ते एका कॉन्व्हेन्ट शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आणि नंतर दांडेकर महाविद्यालयातही शिकवू लागले. १९८२-८३पर्यंत ते शिक्षकी पेशात होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबीरेही ते घेत असत. त्याच जोडीने त्यांनी १९८०मध्ये एक लहानसे हॉटेल सुरू केले.

१९८५च्या सुमारास बोरीगाव येथील एक डोंगर विकत घेऊन त्यांनी एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ‘हिल झिल’ नावाचे रिसॉर्ट सुरू केले. आलेल्या पर्यटकाला निसर्गाच्या सान्निध्यात भरपूर मनोरंजन आणि उत्तम सेवा त्यांनी दिल्याने पर्यटकांचा त्यांच्याकडे ओघ वाढला. पुढे श्रीकांत सावे यांनी मॉरिशस पर्यटन सहलीही यशस्वीपणे आयोजित केल्या. त्याला पालघर जिल्ह्य़ातील पर्यटनप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभला.

त्याचवेळी त्यांच्यातला फळ उत्पादकही सजग होता! चिकू या नाशिवंत फळाला बाजारामध्ये पुरेसे स्थान मिळत नसल्याची खंत सावे कुटुंबीयांना होती. त्यातूनच वाइन उद्योगाची दिशा त्यांना सापडली.

सप्टेंबर २०१६ मध्ये कोणत्याही फळापासून वाइन करण्यासंदर्भात परवानगी देण्याचे धोरण राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये नऊ  हजार चिकू घेऊन त्यांना नैसर्गिक परिस्थितीमध्ये पिकविण्यात आले. या परिपक्व फळाचा लगदा करून त्यापासून वाइन बनवण्याचा प्रयोग बोर्डी येथे स्थापन केलेल्या ‘हिल झिल वाइन्स’ या वाइनरीत यशस्वीरीत्या जानेवारी २०१७ दरम्यान करण्यात आला. चिकूपासून वाइन करण्याचे तीन बॅच उत्पादन घेतले गेले असून त्या बरोबरीने कमरक, अननस, राजापुरी आंबा, स्ट्रॉबेरी, दालचिनी तसेच मधापासून वाइनचे उत्पादन श्रीकांत सावे यांनी केले. या कामात त्यांना कन्या प्रियंका सावे यांचे खंबीर सहकार्य लाभत आहे. ‘फ्रुझ्झान्ते’ या ब्रॅण्डअंतर्गत या फळांच्या वाइनचे मार्केटिंग करण्यात येत असून राज्यातील शहरी भागांमध्ये या वाइनला विशेष मागणी आहे.

चिकूमध्ये साखरेचे (फ्रुक्टोस) प्रमाण पुरेसे असल्याने त्यापासून तयार करण्यात आलेल्या वाइनमध्ये अतिरिक्त साखर टाकण्याची गरज भासली नाही. अल्कोहोलचे कमी प्रमाण आणि १०० टक्के ग्लुटोनमुक्तता हे या वाइनचे वैशिष्टय़ आहे.

द्राक्षापासून तयार करण्यात येणाऱ्या वाइनला राज्य उत्पादन शुल्क माफ आहे, मात्र इतर सर्व फळांच्या वाइनवर १०० टक्के उत्पादन शुल्क लावले जात असल्याने चिकूची वाइन तुलनात्मक महाग आहे. तरीदेखील या वाइनच्या विशिष्ट स्वादामुळे चिकूपासून तयार केलेली वाइन दर्दी मंडळींमध्ये प्रसिद्ध होत आहे. बोर्डी घोलवड येथे सर्व प्रकारच्या फळांपासून वाइन तयार करण्याचा सावे पिता-पुत्रीचा मानस असून बोर्डी- घोलवड परिसरात वाइन पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कमरक फळापासून तयार करण्यात येणाऱ्या वाइनला ‘जीवा’ असे संबोधण्यात येत असून या वाइनच्या विक्रीमधून मिळणाऱ्या नफ्यातून परिसरातील आदिवासी बांधवांचा विकास साधण्याचा प्रयत्न एक सामाजिक उपक्रम म्हणून करण्यात येत आहे.

वाइनचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी प्रियंका सावे यांनी वाइन परीक्षणा संदर्भातील अभ्यासक्रम उत्तीर्ण केला. स्वत: अमेरिकेमधून अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर आपल्या मूळ गावी त्या परतल्या. दहा ते पंधरा रुपये प्रति किलो इतक्या माफक दराने विकल्या जाणाऱ्या चिकूची मूल्य वृद्धी व्हावी, या नाशिवंत फळाला वैभव प्राप्त करून देता यावे तसेच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, हा प्रियंका सावे यांचा मनोदय आहे.

चिकू ते वाइन..

* चिकू फळाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच त्याचे उत्पादन फायदेशीर ठरावे यासाठी सावे यांच्या मनात चिकूपासून वाइन करण्याचा विचार आला.

* या कामी कॅनडा येथील वाइन क्षेत्रातील सल्लागार डॉमनिक रिवॉर्ड यांची मदत त्यांना झाली.

* चिकू या फळातील चीकजन्य पदार्थ वेगळा केल्यानंतर त्यापासून वाइन करणे शक्य झाले.

* फळातील नैसर्गिक गोडवा, स्वाद आणि गंध यांचा उपयोग करून चिकूपासून वाइन करण्याचे तंत्र अवगत करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 2:00 am

Web Title: shrikant save developed the technique of wine from chicku mango pineapple
Next Stories
1 पालघरमध्ये हजारो दूरध्वनी बंद
2 राज्यात आज निवडणूक झाली तर काय असेल निकाल ? काय सांगतोय सर्वे ?
3 वृद्ध आईला रस्त्यावर बेवारस सोडत मुले परागंदा
Just Now!
X