अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. ज्यासंदर्भातली ऑडिओ क्लिप जाहीर झाल्यावर निषेधाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. भाजपाने श्रीपाद छिंदमची हकालपट्टी केली. त्याचे उपमहापौरपद रद्द केले तसेच मनपाच्या महासभेत छिंदमचे नगरसेवकपदही रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर झाला होता.

छिंदम विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला, छिंदमला सशर्त जामीन मंजूर झाल्यावर तो अज्ञातस्थळीही गेला होता. राजकीय आकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं छिंदमने त्याच्या जामीन अर्जात म्हटलं होतं. श्रीपाद छिंदम निवडणूक लढवणार की नाही याबाबत विविध चर्चा सुरु होत्या. अशात अहमदनगरच्या प्रभाग ९ मधून त्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अहमदनगरमध्ये चर्चांना उधाण आले आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर २०१८ मतदान होणार आहे तर मतमोजणी १० डिसेंबर २०१८ ला होणार आहे

काय आहे नेमके प्रकरण?
श्रीपाद छिंदमने उपमहापौरपदावर असताना एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरले. छिंदमच्या फोनची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर श्रीपाद छिंदमवर टीका झाली त्याचा निषेध करण्यात आला. १६ फेब्रुवारीला श्रीपाद छिंदमला पोलिसांनी अटक केली होती.