देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र या लॉकडाउनमळे अनेक नवनवीन समस्या निर्माण झाल्याचेही दिसत आहेत. आर्थिक घडामोडींना ब्रेक लागण्याबरोबरच देशभरातील करोडो मजुरांच्या हातचा रोजगार गेल्याचे दिसून आले. तर, महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू झाल्यापासून सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जेव्हापासून महाराष्ट्रात लॉकडाउनला सुरुवात झाली, तेव्हापासून राज्यातील सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व टिकटॉकचे व्हिडिओ असतील, या सर्वांच्या माध्यामातून भडकाऊ पोस्ट टाकणे, महिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे, आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणे, अफवा पसरवणे, समाजात तेढ निर्माण करणे इत्यादी सर्व चुकीच्या गोष्टी आहेत.  मध्यंतरी टिकटॉकच्या माध्यमातून बलात्कार व अ‍ॅसिड हल्ल्यांसारख्या घटनांना प्रोत्साहन मिळेल, असे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

तसेच,   अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकणे अत्यंत चुकीचे आहे. या सर्वांवर महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाची करडी नजर आहे. आम्ही कुणालाही सोडणार नाही. जो कोणी अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकेल त्याच्याविरोधात कठोरातली कठोर कारवाई महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाकडून केली जाईल. असा इशाराही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.