आसमंत दणाणून सोडणारा ढोल ताशांचा गजर. काळजाचा ठाव घेणारा तुतारीचा सूर.. चित्तथरारक मर्दानी खेळ. ६३ गावांतून एकत्र भव्य शिवज्योत यासह घोडे, उंट यांचा सहभाग आणि ‘जय शिवाजी जय भवानी घोषणा’ देत भव्य अशा शिवप्रेरणा यात्रेने किल्ले सिंधुदुर्ग महोत्सवाची सुरुवात झाली. शेकडो शिवप्रेमी, भगवे फेटे घालून, भगवे ध्वज हाती घेताना या शोभायात्रेत सहभागी झाले. मालवण देऊळवाडा या ठिकाणाहून निघालेल्या या शोभायात्रेचे उद्घाटन व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर भव्य अशी शिवज्योत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार, आमदार वैभव नाईक व माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.
या शिवप्रेरणा यात्रेत प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे व सहकारी, तहसीलदार वनिता पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा साहाय्यक माहिती अधिकारी संध्या गारवारे, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, बबन शिंदे, किरण वाळके, पूजा करलकर, दीपक पाटकर, महादेव पाटकर, विठ्ठल पटकारे यांच्यासमवेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. तसेच महोत्सवात नृत्य कला सादर करण्यासाठी आसाम येथून आलेला संघ व तारकर्ली येथील भारतीय गोथाकुरी व जलतरण क्रीडा संस्था प्याडीचे सर्व सदस्य, सागरीतज्ज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी, वारकरी समुदाय, ऐतिहासिक चित्ररथ यात सहभागी झाले होते. एकूणच महोत्सवाच्या निमित्ताने मालवण नगरी शिवाजी महाराजांच्या जयघोषात भगवी झाल्याचे चित्र होते. सायंकाळी उशिरा प्रेरणा यात्रेची मालवण बंदर जेटी येथे सांगता झाली.
आज महोत्सवाचे उद्घाटन
२२ ते २४ एप्रिल या तीन दिवसांत विविध कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते टोपीवाला बोर्डिग मैदान येथे उद्घाटन करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची माहिती सांगणाऱ्या कार्यक्रमाचा खजिना इतिहास प्रेमीसह युवा पिढीला अनुभवण्यास सुवर्णसंधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे अडीचशे कलावंताचा शिवकालीन युद्धकाळाचा थरार ‘शिव शौर्यत्सव’ या कार्यक्रमात दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पाहता येणार आहे. खास पर्यटकांसाठी किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवासी बोट सेवेच्या दरात ५० टक्के सवलत दिली आहे.