वर्धा येथे प्रलंबित मागण्यांसाठी विना अनुदानीत शिक्षकांनी आज खासदार व आमदाराच्या घरा समोर ठिय्या आंदोलन करून आपल्या  प्रश्नांकडे  लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला.

मागील २० वर्षांपासून राज्यातील हजारो शिक्षक विना वेतन काम करीत असून, या शिक्षकांकडे अद्याप शासनाचे लक्ष नसल्याने हे आंदोलन सुरू केल्याचे शिक्षक नेते अजय भोयर यांनी सांगितले. १ एप्रिल २०१९च्या निर्णयानुसार पात्र शाळांना २० टक्के अनुदान व वीस टक्के अनुदान  देणाऱ्या शाळांना ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र एक वर्ष लोटूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. शासन विनाअनुदानीत शाळा शिक्षकांच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अनुदान घोषित झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनासह शाळा निधी घोषित करावा. शिक्षक व कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण द्यावे. अनुदानाचा पुढील टप्पा तात्काळ लागू करावा, अशा मागण्या कायम विना अनुदानीत शाळा कृतीसमितीतर्फे  आज करण्यात आल्या. आमदार.डॉ. पंकज भोयर यांच्या घरा समोर शिक्षकांनी ठिय्या देत घोषणाबाजी केली. तसेच, खासदार रामदास तडस यांच्याही घराजवळ शिक्षकांनी ठिय्या दिला होता. मनिष मारोडकर, अमित प्रसाद,  कुंडलिक राठोड,  किशोर चौधरी, सिकंदर लोटे, सिध्दार्थ वाणी, पवन माटे, गणेश चंदीवाले, संतोष जगताप, मुकेश इंगोले, सुनील गायकवाड व अन्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.