News Flash

काळजाचा थरकाप उडवणारे सोनईचे तिहेरी हत्याकांड

अक्षरश: थरकाप उडवणारी ही घटना होती.

सोनई (नेवासे), खर्डा (जामखेड), जवखेडे (पाथर्डी), लोणीमावळा (पारनेर), कोपर्डी (कर्जत) यांसारख्या जातीय हिंसेचा संदर्भ असलेल्या नगर जिल्ह्य़ातील घटनांनी गेल्या पाच, सहा वर्षांत राज्याला हादरवले. याची सुरुवात सोनईतील गुन्ह्य़ाने झाली होती. दलित समाजाच्या तरुणाचे सवर्ण वर्गातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून, ‘ऑनर किलिंग’ मधून तरुणासह तिघांची अत्यंत निर्घृण पद्धतीने गणेशवाडी येथे हत्या करण्यात आली. हत्या करणारे ऊस बागायतदार होते. हत्या झालेले मेहतर समाजातील सफाई कामगार होते. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे हात, पाय, धड, मुंडके ऊस कापण्याच्या अडकित्याने तुकडे करून ते कूपनलिकेत टाकले होते. अक्षरश: थरकाप उडवणारी ही घटना होती.

याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर त्यास दलित विरुद्ध सवर्ण असाही रंग चढू लागल्याने तपास  गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला.

२०१३ ला पहिल्याच दिवशी ही घटना घडली. प्रमुख आरोपी पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८, नेवासे, गणेशवाडी) याची २२ वर्षांची मुलगी नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेत बी. एड्ला शिकत होती. याच संस्थेतील सचिन सोनलाल धारू (२४, मूळ रा. खंडवा, मध्यप्रदेश) हा सफाई कामगार म्हणून काम करत होता. कॉलेजमध्ये दोघांचे प्रेमसंबंध जुळले. या कॉलेजमध्ये खोदकामासाठी जेसीबी भाडय़ाने आणला. त्यावर अशोक सुधाकर नवगिरे (वय २८) हा चालक होता.

कॉलेजमध्ये संदीप राजू थनवार (वय २४, किणी, भुसावळ, जळगाव) हा सुपरवायजर होता.  तो व सचिन नातेवाईक होते. तसेच नवगिरे,संदीपची चांगली ओळख होती. मुलीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या सचिन धारूचा काटा काढण्यासाठी त्याला संदीपमार्फत दरंदले वस्तीवर सफाईकामासाठी बोलावण्यात आले. १ जानेवारीला सकाळी सचिन धारू, संदीप थनवार व कॉलेजमधीलच आणखी एक सफाई कर्मचारी राहुल राजू कंडारे (वय २०, मलकापूर, बुलडाणा) अशा तिघांनी तेथे खोदकाम सुरू केले.

तोपर्यंत पोपट दरंदले, त्याचा मुलगा गणेश उर्फ प्रवीण (वय १९), पोपटचे दोन भाऊ रमेश (वय ३८) व प्रकाश (वय ३४), मावसभाऊ संदीप माधव कुऱ्हे (वय ३३), आणखी एक नातलग अशोक रोहिदास फलके (वय ४०) तेथे आले. नवगिरे तेथे होताच. त्यांनी संदीप थनवार याला उचलून त्याचे डोके सेफ्टिक टँकच्या पाण्यात बुडवले.आरोपींनी राहुल याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला तर सचिनला पकडून प्रथम त्याचे हात पाय ऊस कापण्याच्या अडकित्याने तोडले. नंतर मुंडके धडापासून वेगळे केले. सचिनचे तोडलेले हात, पाय कूपनलिकेत टाकून दिले तर मुंडके व धड एका कोरडय़ा विहिरीत खड्डा खोदून पुरले. इतर दोघांचे मृतदेह संडासच्या टाकीत पुरले. कूपनलिकेत मानवी अवयव सापडल्याने, दुसऱ्या दिवशी गुन्ह्य़ाला वाचा फुटली.

घटनाक्रम

  • घटना १ जानेवारी २०१३ च्या सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान
  • सातही आरोपी अटक केल्यापासून कारागृहातच, त्यांचा जामीनअर्ज उच्च न्यायालयाने वेळोवेळी फेटाळला.
  • प्रथम तपास सोनईचे सहायक निरीक्षक पाटील यांच्याकडे, आरोप झाल्याने नंतर श्रीरामपूरचे उपअधीक्षक गांगर्डे यांच्याकडे, एक महिन्याने सीआयडीचे उपअधीक्षक एस. डी. बांगर, उपनिरीक्षक रऊफ शेख, खलिल शेख व रमेश कालंगडे यांच्या पथकाकडे वर्ग.
  • दि. २६ मार्च २०१३ रोजी ९८२ पानांचे दोषारोपपत्र दाखल
  • खटल्याची सुरुवातीची सुनावणी नेवासे येथील सत्र न्यायालयात नंतर नाशिककडे वर्ग
  • खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती
  • खटल्यात ५३ साक्षीदारांची तपासणी

खटला नाशिकला वर्ग

नेवासे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होण्याच्या वेळी मृतांच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत खटल्याची सुनावणी जळगाव किंवा नाशिकला करावी, अशी याचिका दाखल केली. त्यानुसार सन २०१५ मध्ये खटला नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग केला. नेवासे येथे साक्षीदारांवर दडपण येण्याची शक्यता आहे, आमच्यावरही हल्ला होण्याची शक्यता आहे, असे मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 3:01 am

Web Title: sonai triple murder of dalit family nashik district court ahmednagar police
Next Stories
1 जगभरातील बेने इस्रायली अलिबागमध्ये!
2 सोलापूरमध्ये वस्त्रोद्योगाने भरारी घेण्यासाठी पंखांचे बळ हवे!
3 साप साप म्हणून भुई धोपटायचं थांबवा; रामदास कदमांचा खैरेंना टोला!
Just Now!
X