श्री श्री रविशंकर यांचा दावा

राममंदिर तर अयोध्येतच होणार, परंतु ते दोन्ही समाजाच्या संमतीने होईल, न्यायालयाचा निर्णय दोन हृदयांना जोडू शकत नाही, त्यामुळेच माझी याबाबत काही भूमिका आहे. परंतु काही लोकांना माझी भूमिका मान्य नाही, ते मला विरोध करत आहेत, कारण त्यांना भांडणेच हवी आहेत, असे प्रतिपादन श्री श्री रविशंकर यांनी नगरमध्ये केले.

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने शहरात उभारलेल्या ज्ञानमंदिराच्या लोकार्पणासाठी श्री श्री रविशंकर येथे आले होते. तत्पूर्वी साधकांशी संवाद साधताना त्यांनी अयोध्येतील राममंदिरासाठी त्यांनी मध्यस्थ म्हणून बजावत असलेली भूमिका स्पष्ट केली. अयोध्येत राममंदिर न झाल्यास भारताचा सीरिया होईल, या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा त्यांनी केला.

आपण राममंदिराच्या प्रश्नावर मध्यस्थ म्हणून स्वीकारलेल्या आपल्या भूमिकेला निश्चितच यश प्राप्त होईल, असा दावा करत रविशंकर म्हणाले, राममंदिर अयोध्येतच होईल, परंतु ते दोन्ही समाजाच्या मान्यतेने होईल. निर्मोही आखाडय़ाचे ९० वर्षांचे महंत आपल्याकडे आले, आपले जीवन संपत आले, उर्वरित हयातीत तरी आपल्याला अयोध्येत राममंदिर झाल्याचे पाहायचे आहे, असे सांगत त्यांनी मला मध्यस्थाची भूमिका बजावण्यास सांगितले. मात्र सन २००२ मध्ये केलेले हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. नंतर शंकराचार्यानी प्रयत्न केले मात्र त्यांनाही जमले नाही, ते पुन्हा माझ्याकडे आले. मी आतापर्यंत ५०० इमामांशी चर्चा केली. या सर्वानीच रामलल्ला तेथे आहे तर तो तेथून हटू शकत नाही, असे सांगितले आहे.

इस्लाम धर्मातही वादग्रस्त जागेवरील नमाज कबूल केली जात नाही, असे मानले जाते. ६० एकर जागेतील एक एकर जागा राममंदिरासाठी देण्याच्या प्रस्तावावर वाद झाले. आता ५ एकर जागा मशिदीसाठी देऊन उर्वरित जागेत मंदिर बांधण्याचा प्रस्ताव आहे. काहींना ते मान्य आहे. न्यायालयाचा निर्णय दोन हृदयांना जोडू शकत नाही, परंतु न्यायालयानेही बाहेर तडजोड होऊ शकते का ते पाहण्यास सांगितले आहे. माझी मध्यस्थी काहींना पसंत नाही, ते माझ्या भूमिकेला विरोध करत आहेत. ज्यांना भांडणे, वाद हवे आहेत, ते विरोध करत आहेत, परंतु दोन्ही समाजाला शांतता हवी आहे. राममंदिर तर तेथेच होणार, असे रविशंकर यांनी स्पष्ट केले.

आम्ही आधी केले, नंतर सरकारने!

आर्ट ऑफ लिव्हिंगने सन २००८ व २०१० मध्ये जालना येथे स्वच्छता अभियान सुरू केले, ते पुढे सन २०१४ मध्ये पंतप्रधानांनी स्वीकारले. १९९७ मध्ये बेटी बचाओ अभियान सुरू केले तेही नंतर सरकारने स्वीकारले. जलयुक्त शिवारची योजना सुरू होण्यापूर्वी देशातील ३८ नद्या स्वच्छ करण्याची व १ हजार तलावांची सफाई मोहीम राबवली. तेच पुढे महाराष्ट्रातील सरकारने जलयुक्तमधून सुरू केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर विदर्भातील ५१८ गावांतून आमच्या साधकांनी पदयात्रा काढली, तेथील शेतकऱ्यांना साधना प्रक्रिया सांगितली, त्यानंतर या सर्व गावांतील आत्महत्या बंद झाल्या, असा दावाही रविशंकर यांनी केला.

नीरव मोदीचा संदर्भ

बँकांचे पैसे घेऊन परदेशात पळून जाणाऱ्यांवरही रविशंकर यांनी टीका केली. अशांचा उल्लेख त्यांनी ‘ढग’ असा केला. कर्माची फळे भोगावीच लागतात, याचा संदर्भ देताना त्यांनी ही टीका केली. काहींना उशिरा भोगावी लागली तरी ती चुकणार नाहीत, आता ते परदेशात पळतात, सरकार त्यांचा पाठलाग करत आहे. काहींनी नकली हिरे विकले, त्याचीही फळे त्यांना भोगावी लागतील, असे ते नीरव मोदीचा नामोल्लेख टाळत म्हणाले.