आचारसंहितेचा फटका

मुंबई : विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे एसटी कर्मचाऱ्यांना बोनसऐवजी फक्त दहा हजार रुपये उचल देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. २२ ऑक्टोबरपासून उचल देण्यात येणार असून ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केले नसतील त्यांनी तातडीने त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. उचल घेतलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापून घेतली जाणार आहे.

एसटी महामंडळात १ लाख चार हजार कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये बोनस, दहा हजार रुपये उचल, महागाई भत्ता, वेतनातील थकबाकी अशी २० ते २५ हजार रुपये रक्कम मिळाली होती. तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस दिला होता. यंदा कर्मचाऱ्यांना किमान पंधरा हजार रुपये बोनस देण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून केली जात होती. आचारसंहितेमुळे बोनस देण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेतला जाऊ शकत नसल्याने दहा हजार रुपये उचल देण्यात येईल. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पुढच्या वेतनांतून समान दहा हप्त्यांमध्ये कापली जाणार आहे. २५ ऑक्टोबपर्यंत आचारसंहिता असल्याने त्यानंतरच बोनस जाहीर होण्याची शक्यता आहे.