मुंबईत विश्रामगृह विकत घेतांना स्टेट बॅंक स्टाफ युनियनच्या पदाधिकऱ्यांनी मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी संघटनेचे पदाधिकारी व सभासदांनी मुंबई पोलिस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती सदस्यांनी येथे दिली. या घोटाळ्यामुळे ही युनियनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

स्टेट बॅंक स्टाफ युनियन ८० वष्रे जुनी आहे. महाराष्ट्र व गोवा, अशी दोन राज्य मिळून स्टेट बॅंक कर्मचाऱ्यांची ही संस्था असून सुमारे २५ ते ३० हजार नोंदणीकृत सदस्य यात सक्रीय आहेत. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी स्टेट बॅंकेच्या राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संघटनेचे हक्काचे विश्रामगृह असावे, असा प्रस्ताव समोर आला. याला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानुसार मुंबईत तीन फ्लॅटचे विश्रामगृह खरेदी करण्याचा निर्णय झाला. यासाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी वर्गणी व सदस्य शुल्क गोळा केले. ७ कोटी रुपयात ही खरेदी करून स्टेट बॅंक स्टाफ युनियनचे विश्रामगृह तयार करण्यात आले. मात्र, ही खरेदी करतांना मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोफ आता करण्यात आला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया स्टाफ युनियन आणि एस.बी.आय.एम्प्लॉईज एम.एस.पटेल को ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने वडाळा येथे विश्रामगृहासाठी खरेदी करण्यात आलेल्या फलॅटस्च्या व्यवहारात युनियनच्या आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पद आणि अधिकाराचा दुरुपयोग करून हा गैरव्यवहार केल्याचा युनियनच्या काही सदस्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात तशी तक्रार वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस ठाणे, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाणे आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई या ठिकाणी दाखल झाली आहे.

या प्रकरणी युनियनचे पुण्याचे पदाधिकारी राजेश मुळे, सोसायटीचे औरगांबाद येथील सभासद अरुण जोशी आणि चंद्रपुरातील युनियनचे सदस्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार युनियनचे सरचिटणीस आणि सोसायटीचे अध्यक्ष जयप्रकाश खत्री यांनी युनियनच्या आणि सोसायटीच्या हजारो सभासदांचा विश्वासघात केला असून घटनेतील अनेक तरतुदींना बगल देत हा व्यवहार केला, असे या तक्रारीत म्हटले आहे. बाजारभावापेक्षा अधिक भावाने खरेदी केलेल्या या वास्तूच्या बिल्डरसोबत झालेल्या करारनाम्यात या पदाधिकाऱ्यांनी अनेक अनपेक्षित आणि युनियनचे मोठे नुकसान करणाऱ्या अटी मान्य केल्याचे नमूद केले आहे. या वास्तूच्या खरेदीचा कोटय़वधीत व्यवहार करताना जयप्रकाश खत्री यांनी कोणालाही न कळवता परस्पर व्यवहार करून नंतर आपली चूक लपवण्यासाठी त्यांनी दिशाभूल करणारी खोटी माहिती देऊन मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिस चौकशी करीत आहेत, अशीही माहिती येथे देण्यात आली.

यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष खत्री म्हणाले की, मार्च २०१७ मध्ये युनियनची निवडणूक असल्यामुळे विरोधकांनी असे आरोप करणे सुरू केले आहेत. पोलिस व उपनिबंधकांकडे तक्रारी झालेल्या आहेत. पोलिसांना सर्व कागदपत्रे आणि म्हणणे सादर केले आहे. फ्लॅटची खरेदी नियमानुसार आहे. यात कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही. सदस्यांनी त्यांच्या पगाराच्या लेव्हीमधून जमा केलेल्या पैशातूनच फ्लॅटची खरेदी करण्यात आला असून आज राज्यातील कानाकोपऱ्यातून येणारे एसबीआयचे कर्मचारी कुटुंबासह येथे राहतात. त्यांच्याकडून नाममात्र शुल्क घेतले जाते. कर्करोग व इतर गंभीर आजाराने ग्रस्त कर्मचारी येथे नियमित येतात.