राज्याचं करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं आजचं प्रमाण हे ८१.१३ टक्के असून आज १५,५७५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर १३,३९५ नवे रुग्ण आज आढळून आले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

राज्यात आजवर ११,९६,४४१ रुग्ण बरे झाले असून या सर्वांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातसध्या २,४१,९८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज १५,५७५ रुग्ण बरे झाल्याने रुग्ण बरे होण्याचं आजचं प्रमाणं ८१.१३ टक्के झालं आहे.

पुण्यात दिवसभरात ३२ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ७९८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ५२ हजार २०० एवढी झाली आहे. तर दिवसभरात ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ७६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ८०५ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर पुणे शहरातील १ लाख ३४ हजार ४०५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.